तरुण पिढीचा पुढाकार; भक्ती, परंपरा आणि कौटुंबिक एकजुटीचा अनोखा संगम
⚡बांदा ता.१७-: तब्बल ७८ वर्षांची अखंड गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱ्या बांदेश्वर मंदिर परिसरातील वाळके परिवाराने यंदा जवळपास चार दशकांनंतर गणपतीसमोरील देखाव्याची जुनी परंपरा पुन्हा सुरू केली आहे. परिवारातील तरुण पिढीने पुढाकार घेत साकारलेल्या या देखाव्यात पारंपरिक कलाशैलीसोबत आधुनिक सादरीकरणाचा सुंदर संगम साधण्यात आला आहे.
बांदेश्वर मंदिरानजीक वास्तव्यास असलेल्या वाळके परिवारात सन १९४८ पासून श्री गणेशाची भक्तिभावाने स्थापना केली जाते. पुढे १९७०च्या दशकात परिवारातील ज्येष्ठ पिढीने गणपतीसमोर विविध प्रसंगांवर आधारित आकर्षक देखावे आणि ‘सीन’ साकारण्यास सुरुवात केली. त्या काळात ‘वाळक्यांचा गणपती’ हे बांदा परिसरातील गणेशोत्सवाचे एक विशेष आकर्षण ठरले होते. देखावे पाहण्यासाठी परिसरातील भाविक तसेच नागरिक मोठ्या संख्येने वाळके यांच्या निवासस्थानी भेट देत असत.
मात्र, कालांतराने शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे देखावे साकारण्याची ही परंपरा खंडित झाली. असे असले तरी वाळके परिवाराने श्री गणेशाच्या पूजनाची परंपरा मात्र अखंडपणे सुरू ठेवली.
यंदा परिवारातील तरुण पिढीने जुन्या आठवणींना उजाळा देत सुमारे ४० वर्षांनंतर देखाव्याची परंपरा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी परिवारातील सदस्यांनी एकत्र येत अनेक दिवस मेहनत घेतली. पारंपरिक सजावट, आकर्षक प्रकाशयोजना, निवेदन तसेच विविध दृश्यांच्या माध्यमातून देखावा साकारण्यात आला आहे.
यंदाच्या देखाव्यामागे केवळ सजावटीचे आकर्षण नसून, श्री गणरायाच्या प्रवासातून जीवनमूल्यांचा संदेश देण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. भक्ती, संस्कार आणि सामाजिक संदेश यांची सांगड घालत हा देखावा भाविकांसमोर सादर करण्यात येणार आहे.
आजोबांच्या काळात सुरू झालेली आणि कालौघात थांबलेली देखाव्याची परंपरा नव्या पिढीने पुन्हा सुरू केल्याने वाळके परिवारात आनंदाचे वातावरण आहे. या माध्यमातून परिवाराची गणेशोत्सवाची परंपरा आणि संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भक्ती, परंपरा आणि कौटुंबिक एकजुटीचा हा वारसा यापुढेही कायम ठेवण्याचा निर्धार परिवारातील तरुण पिढीने व्यक्त केला आहे.
