माजी नगरसेविका दिपाली सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांना दिलासा
⚡सावंतवाडी ता. १२-: प्रभाग क्रमांक ३ मधील न्यू सबनिसवाडा परिसरातील रस्त्यावरील खड्डे अखेर नगरपालिका प्रशासनाने बुजविले आहेत. माजी नगरसेविका दिपाली सावंत यांनी या समस्येकडे नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांचे लक्ष वेधल्यानंतर नगराध्यक्षांनी तातडीने दखल घेत प्रशासनाला सूचना दिल्या. त्यानंतर संबंधित खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले.
गेल्या महिनाभरापासून न्यू सबनिसवाडा परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांबाबत नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येत होते. मात्र, त्याकडे अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. अखेर आज पुन्हा एकदा माजी नगरसेविका दिपाली सावंत यांनी नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांच्याकडे हा प्रश्न मांडला. त्यानंतर नगराध्यक्षांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याने खड्डे बुजविण्यात आले.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल दिपाली सावंत यांचे नागरिकांनी आभार मानले. दिपाली सावंत यांनीही तातडीने दखल घेतल्याबद्दल नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
