Headlines

कारिवडे हद्दीवर दुसऱ्या दिवशी व्यापक स्वच्छता मोहीम…

‘कचरा उचलण्यापेक्षा कचरा टाकणे थांबवा’; गणेशोत्सवात शहर स्वच्छ ठेवण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन

⚡सावंतवाडी ता.१२-: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचा दुसरा दिवस कारिवडे येथील सावंतवाडीच्या हद्दीवर राबविण्यात आला. या मोहिमेत सावंतवाडी कृती समितीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कारिवडे हद्दीवर उघड्यावर मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेला कचरा पाहून नगराध्यक्षांनी तीव्र नाराजी व खंत व्यक्त केली. शहराच्या प्रवेशद्वारावरच अशा प्रकारे कचरा टाकला जाणे ही गंभीर बाब असून, स्वच्छता केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्षांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या काळात तसेच त्यानंतरही सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन केले. घरातील ओला व सुका कचरा वेगळा करून तो कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेच द्यावा, तसेच प्लास्टिकचा वापर शक्य तितका टाळून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असेही त्यांनी सांगितले.
नगरपालिका व स्वच्छता कर्मचारी दररोज शहर स्वच्छ करण्याचे काम करतात. मात्र नागरिकांनी आपल्या सवयी बदलल्या नाहीत, तर शहर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवणे शक्य होणार नाही. त्यामुळे सार्वजनिक व मोकळ्या जागांवर तसेच शहराच्या प्रवेशद्वारांवर कचरा टाकणे पूर्णपणे बंद करण्याची गरज असल्याचे नगराध्यक्षांनी नमूद केले.
‘स्वच्छता कर्मचाऱ्यांचा आदर करा’ असे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, नागरिक काही क्षणांत रस्त्यावर कचरा टाकून निघून जातात; मात्र तो कचरा उचलण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना तासन्‌तास मेहनत घ्यावी लागते. हे कर्मचारी केवळ कचरा उचलत नसून आपल्या वतीने शहर स्वच्छ ठेवण्याची मोठी जबाबदारी पार पाडत आहेत.
‘सावंतवाडी ही केवळ नगरपालिका नसून आपले घर, आपली ओळख आणि आपला अभिमान आहे. गणेशोत्सवात आज आपण कचरा उचलला, उद्या पुन्हा उचलू; मात्र आता कचरा उचलण्यापेक्षा कचरा टाकणे थांबवण्याची वेळ आली आहे. स्वच्छता ही केवळ मोहीम न राहता ती आपली जीवनशैली बनवूया,’ असे आवाहन नगराध्यक्षांनी केले.
या स्वच्छता मोहिमेस कृती समितीचे सर्व पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page