Headlines

गणेशोत्सवातील परंपरांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड…

क.म.शि.प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत अनोखे प्रदर्शन:२१ पत्रींपासून कंदमुळांपर्यंत… परंपरांचा वैज्ञानिक उलगडा..

⚡कुडाळ ता.१०-: गणपतीची पूजा ही केवळ धार्मिक विधी न राहता निसर्गपूजा आणि जैवविविधतेची जपणूक यांच्याशीही जोडली गेली आहे. म्हणूनच गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या परिसरातील विविध वनस्पती, झाडे आणि औषधी वनस्पतींची ओळख व्हावी आणि त्यांचे महत्त्व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी येथील क.म.शि.प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत गुरुवारी ‘फेस्टिव्ह – अ सायंटिफिक लूक एक्झिबिशन’ या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होत. गणेशोत्सवातील विविध परंपरा, पूजाविधी आणि निसर्गाशी असलेले नाते विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडत उपस्थितांना वेगळाच अनुभव दिला.
या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख यांच्या हस्ते करण्यात आले. गणपतीची सुंदर मूर्ती, गौरी पूजनाची आकर्षक मांडणी तसेच विद्यार्थ्यांनी रंगचित्रांच्या माध्यमातून साकारलेली गणरायाची विविध रूपे यामुळे प्रदर्शनाची सुरुवातच लक्षवेधी ठरली.
गणपती उत्सव आणि २१ पत्री यांचा संबंध अतिशय सुंदर आणि निसर्गाशी जोडलेला आहे. गणपतीला २१ प्रकारची पाने अर्पण करण्याची परंपरा आहे. याला “एकवीस पत्री” असे म्हणतात. धार्मिक श्रद्धेनुसार या प्रत्येक पत्रीचे गणेशपूजेत विशिष्ट महत्त्व आहे. गणपती बाप्पाला २१ हा अंक प्रिय मानला जातो. त्यामुळे २१ दुर्वा, २१ पत्री आणि अनेक ठिकाणी २१ नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आढळते.
याच गणरायाच्या चरणी अर्पण केल्या जाणाऱ्या २१ पत्रींची ओळख आणि त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. मधुमालती, माका, बेल, दुर्वा, बोर, धोत्रा, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कन्हेर, रुई, अर्जुन, अपराजिता, डाळिंब, देवदार, मरवा, पिंपळ, जाई, केवडा आणि अगस्ती या पत्रींचे वैज्ञानिक महत्त्व, उपयोग आणि वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडली. त्यामुळे परंपरा आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम प्रदर्शनातून अनुभवायला मिळाला.
गणेशोत्सवातील महत्त्वाचा भाग असलेल्या गौरी पूजनाची प्रतिकृती आणि ओवशासाठी लागणारे विविध साहित्य यांचीही आकर्षक मांडणी करण्यात आली होती. तसेच मातीच्या कुशीत वाढणारी विविध कंदमुळे, विशेषतः ऋषिपंचमीला वापरली जाणारी कंदमुळे, त्यांचे उपयोग आणि महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांनी आजी आणि नातीच्या वेषभूषेतून माहिती दिली.
ऋषिपंचमीचे महत्त्व, गणपतीला केळीच्या पानावर वाढला जाणारा नैवेद्य, हळदीच्या पानांचे महत्त्व अशा विविध विषयांवरही विद्यार्थ्यांनी माहिती सादर केली. विविध आकारांच्या आणि प्रकारांच्या वस्त्रमाळा विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेने तयार केल्या होत्या. प्रदर्शनातून अष्टविनायकांचे दर्शन घडविण्यात आले.
पर्यावरणपूरकतेचा संदेश देताना विद्यार्थ्यांनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती, मोदक, फळे आणि उंदीर यांच्या आकर्षक प्रतिकृती मांडल्या होत्या. सध्या प्रचलित असलेल्या पाईप क्लिनरपासून तयार केलेल्या जास्वंदीच्या फुलांची सुंदर मांडणीही लक्षवेधी ठरली. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेला देखावाही प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरला.
हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या सहायक शिक्षिका वैशाली शेट्टी, पूजा खानोलकर, पूर्वा राऊळ, पूजा कारेकर, जान्हवी नाईक आणि सूरज गोसावी यांनी परिश्रम घेतले. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचेही या प्रदार्शनाला उत्तम सहकार्य लाभले.
जुन्या पिढीकडून चालत आलेल्या परंपरा नव्या पिढीला ज्ञात व्हाव्यात आणि प्रत्येक सणामागील वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना समजावा, हा प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता. केवळ परंपरांचे अनुकरण न करता त्यामागील शास्त्रीय आणि पर्यावरणीय विचार समजून घेण्याची संधी या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली.
या अनोख्या प्रदर्शनाला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पालकांनी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या कल्पकतेचे आणि अभ्यासपूर्ण सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.

You cannot copy content of this page