१० हजार १५० रुपयांची रोकड व मटका जुगाराचे साहित्य जप्त; तिघांविरोधात गुन्हा..
⚡कणकवली ता.१०-: कणकवली शहरातील सना कॉम्प्लेक्ससमोरील बाणे पान स्टॉल येथे सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर कणकवली पोलिसांनी शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी दुपारी कारवाई केली. या कारवाईत १० हजार १५० रुपयांची रोकड तसेच मटका जुगारासाठी वापरले जाणारे पावती बुक, कार्बन पेपर आणि बॉलपेन असा साहित्य जप्त करण्यात आला. याप्रकरणी विजय गणपत कदम (वय ४५, रा. टॅबवाडी, कणकवली), विश्राम राजाराम कदम (वय ६५, रा. वरवडे-हेवाळवाडी, ता. कणकवली) आणि पान स्टॉल मालक रविंद्र बाणे (रा. आशिये, ता. कणकवली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सना कॉम्प्लेक्ससमोरील बाणे पान स्टॉलमध्ये कल्याण मटका सुरू असल्याची माहिती कणकवली पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस पथकाने पंचांसह संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली. दुपारी सुमारे २.५० वाजण्याच्या सुमारास पान स्टॉलजवळ एक व्यक्ती पैसे देताना, तर दुकानातील दुसरी व्यक्ती पावती बुकावर आकडेमोड करताना आढळली. पोलिसांनी पावती बुकाची पाहणी केली असता त्यामध्ये ‘कल्याण १०११ ते कल्याण १०६५’ असे छापील क्रमांक असलेल्या पानावर ‘५/९’ अशी नोंद आणि आकडेमोड केलेली दिसून आली. त्यासोबत कार्बन प्रतही होती. पुढील पानांवर ‘कल्याण १०६६ ते कल्याण १२००’ असे क्रमांक छापलेली कोरी पाने होती. पावती बुकामध्ये निळ्या रंगाचा कार्बन पेपरचाही तुकडा आढळला. या ठिकाणी असलेल्या विजय कदम याच्याकडे चौकशी केली असता तो ग्राहकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका खेळवत असल्याचे समोर आले. हा मटका पान स्टॉल मालक रविंद्र बाणे यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्यासाठी स्वीकारत असल्याचेही त्याने सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, पान स्टॉलजवळ असलेल्या विश्राम कदम याने आपण कल्याण मटका खेळण्यासाठी तेथे आल्याचे सांगितल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या कारवाईत १० हजार १५० रुपयांची रोकड मिळून आली. त्यामध्ये २०० रुपयांच्या पाच नोटा, १०० रुपयांच्या ९१ नोटा आणि ५० रुपयांची एक नोट होती. याशिवाय मटका जुगाराच्या आकडेमोडीचे पावती बुक, कार्बन पेपर आणि बॉलपेन असा साहित्याचा समावेश आहे. सदर प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ मधील कलम १२ (अ) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ४९ अंतर्गत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
