रमी खेळणाऱ्या ११ जणांवर कारवाई; रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल जप्त..
⚡सावंतवाडी,ता.१०-: दांडेली-धनगरवाडी येथील एका बंदिस्त घरात सुरू असलेल्या रमी जुगार अड्ड्यावर सावंतवाडी पोलिसांनी छापा टाकून ११ जणांवर कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल संच, जुगाराचे साहित्य, टेबल-खुर्च्या, वातानुकूलन यंत्रणा तसेच आठ दुचाकी असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दांडेली ग्रामपंचायत हद्दीतील घर क्रमांक ५०१ मध्ये ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. श्रीकृष्ण गोविंद पुनाळेकर यांनी त्यांच्या मालकीच्या घरात राजकुमार दिनकर कवठणकर याला जुगार क्लब चालविण्यास परवानगी दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या ठिकाणी गणेश शांताराम सोपटे, सुधीर सोमनाथ राऊळ, नंदकिशोर मनोहर नाईक, अनंत भास्कर सारंग, निरंजन आनंद नाईक, आनंद सोहन केरकर, गजानन महादेव वाडकर, श्रीधर प्रकाश पालव आणि मिलन शांताराम खवणेकर हे रमीच्या पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळताना आढळून आले.
कारवाईदरम्यान जुगाराच्या दोन टेबलांवरील रोख रक्कम व प्लास्टिक कॉईन, आरोपींकडील रोख रक्कम व मोबाईल संच, २६ प्लास्टिक फायबर खुर्च्या, रमी खेळण्यासाठी वापरली जाणारी टेबल्स, पत्त्यांचे बॉक्स, वॉटर प्युरिफायर, एसी व स्टॅबिलायझर, प्लास्टिक टिर्पाय, रजिस्टर तसेच आठ दुचाकी वाहने असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ मधील कलम ४ व ५ अन्वये सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींना BNSS कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. शेलार, पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, API हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास ASI टाकेकर करीत असून, दाखल अंमलदार म्हणून WHC कदम यांनी काम पाहिले.
