Headlines

जि. प. शाळांच्या विकासासाठी अनिल निरवडेकर सरसावले; दोन शाळा घेतल्या दत्तक…

⚡सावंतवाडी ता.०५-: भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४, शाळा क्रमांक ५ दत्तक घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून निरवडेकर यांनी या शाळांमध्ये विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम हाती घेतले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ही घोषणा केली असून तळवणे जिल्हा परिषद शाळा नंबर एक मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे ही वाटप करण्यात आले.

गेल्या २५ वर्षांत जी विकासकामे या शाळांमध्ये झाली नव्हती, ती कामे येत्या काही दिवसांत पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
‘पीएम श्री’ दर्जा मिळालेल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी, यासाठी निरवडेकर यांनी प्रसंगी स्वखर्चातून आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. असाच उपक्रम त्यांनी शाळा क्रमांक ५ मध्येही राबवला जाणार असून,तालुक्यातील तळवणे जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ विद्यार्थ्यांनाही उत्तम शैक्षणिक सुविधा पुरवण्यावर भर दिला जात आहे.
याच शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून सावंतवाडी तालुक्यातील तळवणे जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ या प्रशाळेला आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य नुकतेच अनिल निरवडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी तळवणे शाळा क्रमांक १ चे मुख्याध्यापक श्री. गोसावी, शिक्षक बापूशेठ कोरगावकर, शिक्षिका श्रीमती राऊळ, ग्रामपंचायत सदस्य सावळाराम घाट्ये यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page