आदर्श दूध संस्था स्पर्धेतील यशाबद्दल चेअरमन गजानन गायतोंडे यांचा सत्कार
बांदा/प्रतिनिधी
आदर्श दूध संस्था स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४१ दूध संस्थांमधून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल बांदा पंचक्रोशी दुग्ध संस्थेचे चेअरमन गजानन गायतोंडे व संचालक राजेश पावसकर यांचा बांदा शहर विकास आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक व सुशांत पांगम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
बांदा पंचक्रोशी दुग्ध संस्थेने मिळविलेले हे यश बांदावासीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. संस्थेच्या माध्यमातून शेतकरी व दुग्ध व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, शेतकऱ्यांना तसेच दुग्ध व्यावसायिकांना बोनस देणारी ही एकमेव संस्था असल्याचेही नमूद करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना चेअरमन गजानन गायतोंडे म्हणाले, “हा पुरस्कार केवळ संस्थेचा नसून बांदा पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकरी, संचालक मंडळ, कर्मचारी आणि संस्थेशी जोडलेल्या प्रत्येकाचा आहे. शेतकऱ्यांनी दाखविलेला विश्वास आणि सातत्याने दिलेले सहकार्य यामुळेच संस्था जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवू शकली. भविष्यातही दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी संस्था काम करेल.”
ते पुढे म्हणाले, “दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी आणि स्थानिक शेतकऱ्यांना या व्यवसायातून अधिक उत्पन्न मिळावे, यासाठी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मिळालेला हा सन्मान आमची जबाबदारी आणखी वाढवणारा आहे.”
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर प्रतिनिधित्व करण्यासाठी बांदा पंचक्रोशी दुग्ध संस्थेला संधी द्यावी, अशी अपेक्षाही उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर, ओंकार नाडकर्णी, अर्णव स्वार, झहूर शेख, राकेश विरनोडकर, उमेश सावंत-मोर्ये, विठ्ठल वाळके, दूध संस्थेचे सचिव दीपक चव्हाण आदीसह संस्थेचे सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईप्रसाद काणेकर यांनी केले.
फोटो:-
बांदा पंचक्रोशी दूध संस्थेचे चेअरमन गजानन गायतोंडे व संचालक राजेश पावसकर यांचा सत्कार करताना सुशांत पांगम व ऋतिका नाईक. सोबत साईप्रसाद काणेकर व इतर. (छायाचित्र- नीलेश मोरजकर)
