१९७ नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन :आठ दिवसांत मशीन न हटवल्यास उपोषणाचा इशारा..
⚡कुडाळ ता.३१-: कुडाळ नगरपंचायतीच्या मच्छी मार्केट परिसरात बसवण्यात आलेल्या कचरा विल्हेवाट मशीनमुळे होणाऱ्या तीव्र दुर्गंधीचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येविरोधात परिसरातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी खंडू पवळ यांची भेट घेत निवेदन साद केले. या निवेदनावर तब्बल १९७ नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मच्छी मार्केट परिसरातील दाट लोकवस्तीमध्ये कचरा विल्हेवाट मशीन बसवण्यात आल्याने सातत्याने दुर्गंधी पसरत असल्याचे नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच माशा, डास आणि अन्य कीटकांचा प्रादुर्भाव वाढून रोगराई पसरण्याची शक्यताही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या दुर्गंधीचा मच्छी मार्केटमधील विक्रेते, ग्राहक तसेच परिसरातील मटन व चिकन विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक असले, तरी त्यासाठी दाट लोकवस्तीच्या परिसराची निवड योग्य नसल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले. सदर मशीन गावाबाहेरील मोकळ्या व निर्जन जागेत स्थलांतरित करावी, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
नगरपंचायतीने या प्रकरणाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्येवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत सदर मशीन वस्तीच्या परिसरातून हटवण्यात आली नाही, तर तीव्र उपोषण करण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
गणेशोत्सव तोंडावर असताना कचरा व्यवस्थापन आणि दुर्गंधीचा प्रश्न ऐरणीवर आल्याने नगरपंचायत प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
