Headlines

ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वास मळगाव वाचन मंदिरातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली…

डॉ. अरविंद खानोलकर यांच्या स्मृतींना उजाळा; सेवाव्रती कार्याचा मान्यवरांकडून गौरव..

⚡सावंतवाडी,ता २६-: सावंतवाडी : बालरोगतज्ज्ञ, सेवाव्रती आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले डॉ. अरविंद दत्तात्रय खानोलकर ऊर्फ सर्वांचे लाडके ‘अरुण भाई’ (जन्म : १३ मार्च १९४४, निधन : १७ ऑगस्ट २०२६) यांच्या दहाव्या दिवसानिमित्त कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.

रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात झालेल्या या सभेला समाजातील विविध स्तरांतील मान्यवर, डॉक्टरांचे चाहते, कुटुंबीय, ग्रामस्थ, वाचक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचन मंदिराच्या कार्यवाह सौ. स्नेहा महेश खानोलकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. खानोलकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासोबतच त्यांच्या सेवाव्रती कार्याचा गौरव करण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सावंतवाडीचे सेवानिवृत्त प्राध्यापक सुभाष गोवेकर, सेवानिवृत्त सिंधुदुर्ग जिल्हा कामगार अधिकारी शेखर पाडगावकर, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी, प्रसिद्ध लेखक-कवी प्रकाश तेंडुलकर, समाज कल्याण भूषण तथा वाचन मंदिराचे संचालक चंद्रकांत जाधव, ग्रंथपाल, मळगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य आनंद देवळी आणि वाचन मंदिराचे अध्यक्ष महेश खानोलकर यांनी मनोगत व्यक्त केले.

वक्त्यांनी डॉ. खानोलकर यांच्या मिश्किल बोलण्याची शैली, वरकरणी कठोर वाटणारा मात्र अंतःकरणाने अत्यंत हळवा स्वभाव, तसेच त्यांच्या परिपूर्ण वैद्यकीय ज्ञानाचे आणि उपचार कौशल्याचे स्मरण केले. वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय न मानता सेवाभावाने आयुष्यभर रुग्णसेवा करणारे आणि रुग्णसेवेलाच ईश्वरसेवा मानणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी समाजात अमीट ठसा उमटवला, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

गोरगरीब रुग्णांसाठी सदैव धावून जाणारे, पैशापेक्षा माणुसकीला अधिक महत्त्व देणारे आणि मळगाव-सावंतवाडी परिसरातील असंख्य बालकांना आरोग्यसेवा देणारे डॉक्टर म्हणून डॉ. खानोलकर यांची कारकीर्द सदैव स्मरणात राहील, असेही वक्त्यांनी नमूद केले.
मान्यवरांच्या श्रद्धांजलीपर मनोगतानंतर भावपूर्ण वातावरणात सभेची सांगता झाली. यावेळी ग्रामस्थ, वाचक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page