Headlines

इन्सुलीत आयोजितरानभाज्या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

वेदिका परब यांचा महाराष्ट्रासह देशभर उपक्रम नेण्याचा संकल्प: विशाल परब यांचा महिला उद्योजकतेला आधुनिक बाजारपेठेची जोड देण्याचा विश्वास..

⚡सावंतवाडी ता.२२-: कोकणच्या लाल मातीत आणि डोंगरदऱ्यांत नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या विविध रानभाज्यांना स्थानिक चुलीपासून देश-विदेशातील बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने इन्सुली येथे आयोजित करण्यात आलेल्या रानभाज्या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक खाद्यसंस्कृती, रानभाज्यांचे औषधी गुणधर्म आणि कोकणातील महिलांचे पाककौशल्य यांचा सुरेख संगम या महोत्सवात पाहायला मिळाला.

महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्या तसेच त्यापासून तयार करण्यात आलेल्या पारंपरिक पाककृतींची मांडणी करण्यात आली होती. स्थानिक महिलांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. या उपक्रमामुळे महिलांना आपल्या पारंपरिक कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या ज्ञानाला आर्थिक आणि व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याची नवी दिशा मिळाली आहे.
इन्सुलीपुरता महोत्सव मर्यादित राहणार नाही : वेदिका परब
युवा सामाजिक कार्यकर्त्या वेदिका विशाल परब यांनी महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत हा उपक्रम सावंतवाडी व सिंधुदुर्गच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रासह देशभर नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
“कोकणच्या मातीत निसर्गाने रानभाज्यांची समृद्ध परंपरा दिली आहे. या रानभाज्या केवळ घरातील स्वयंपाकघरापुरत्या मर्यादित न राहता त्यांना व्यापक ओळख मिळणे आवश्यक आहे. महिलांच्या पारंपरिक पाककलेला योग्य प्रशिक्षण, आधुनिक पॅकेजिंग आणि बाजारपेठ मिळाल्यास अनेक महिला स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतात,” असे त्यांनी सांगितले.
रानभाज्यांना ग्लोबल मार्केट मिळू शकते : विशाल परब
भाजपचे युवा नेते विशालजी प्रभाकर परब यांनी कोकणातील रानभाज्यांमध्ये मोठी आर्थिक, व्यावसायिक आणि निर्यातीची क्षमता असल्याचे सांगितले.
“रानभाज्यांचे संशोधन, दस्तऐवजीकरण, प्रक्रिया, आकर्षक पॅकेजिंग आणि प्रभावी मार्केटिंग झाल्यास या नैसर्गिक संपत्तीला देश-विदेशात मोठी बाजारपेठ मिळू शकते. नैसर्गिक, पारंपरिक आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थांना जगभर मागणी वाढत आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन ग्रामीण महिलांच्या पारंपरिक ज्ञानातून मोठे उद्योग उभे राहू शकतात,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महिलांसाठी सावंतवाडीत आठवडा बाजाराचा प्रयत्न
सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी महोत्सवाचे कौतुक करत स्थानिक महिलांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी यासाठी सावंतवाडीत आठवडा बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. रानभाज्या, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि घरगुती उत्पादनांना थेट ग्राहक मिळाल्यास महिलांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
महोत्सवाला डॉ. विजय दळवी, जिल्हा परिषद सदस्य नितीन एकनाथ राऊळ, पंचायत समिती सदस्य सदाशिव विठ्ठल राणे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष महेश शिवाजी सावंत, उपाध्यक्ष सचिन दळवी, माजी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, खजिनदार सदानंद कोरगावकर, महेंद्र पालव, साईनाथ राणे, मुख्याध्यापक शेवाळे, अजय कोठावळे, पालव मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन गौरवी पेडणेकर व शुभम धुरी यांनी केले. डॉ. विजय दळवी यांनी आभार मानले.
रानभाज्यांपासून महिला उद्योजकतेपर्यंत…
इन्सुलीतील या महोत्सवाने कोकणच्या रानात उगवणारी प्रत्येक रानभाजी ही केवळ खाद्यपदार्थ नसून परंपरा, आरोग्य, रोजगार आणि अर्थकारणाची संधी असल्याचा संदेश दिला. रानभाज्यांचे संवर्धन, औषधी गुणधर्मांवरील संशोधन, आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञान, आकर्षक पॅकेजिंग आणि व्यापक मार्केटिंग यांची सांगड घातल्यास कोकणच्या या नैसर्गिक संपत्तीला मोठी बाजारपेठ मिळू शकते. त्यातून ग्रामीण महिलांच्या पारंपरिक ज्ञानाला व्यावसायिक रूप देत ‘घरगुती पाककलेपासून महिला उद्योजकतेपर्यंत’चा प्रवास घडवून आणता येईल.
इन्सुलीचा हा महोत्सव त्यामुळे केवळ चव आणि खाद्यसंस्कृतीचा उत्सव न ठरता कोकणातील रानभाज्यांना जागतिक बाजारपेठ आणि महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा देणारा उपक्रम ठरला.

You cannot copy content of this page