Headlines

मालवण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर १५ दिवसातच गायब

उबाठा शिवसेनेतर्फे सौ. गौरी सावंत यांची आमदारांवर टीका

मालवण (प्रतिनिधी)

मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच मोठ्या गाजावाजाने नियुक्ती झालेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर अवघ्या १५ दिवसांत रुग्णालयातून गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून ठाकरे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत स्थानिक आमदार निलेश राणे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. आमदारांच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरांच्या स्वागतासाठी दिलेले पुष्पगुच्छ तरी आता परत आणावेत,” असा टोला ठाकरे गटाच्या महिला मालवण उपशहरप्रमुख सौ. गौरी सावंत यांनी लगावला आहे.

सौ. गौरी सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आमदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञांची नियुक्ती झाल्याचा दावा करण्यात आला होता. या नियुक्तीनंतर राणे समर्थक पदाधिकाऱ्यांनी संबंधित डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले होते. मात्र, रुजू झाल्यानंतर अवघे १५ दिवस सेवा बजावून हे डॉक्टर सध्या रुग्णालयात अनुपस्थित आहेत. तज्ज्ञ डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला रुग्णांचे आणि गरोदर मातांचे हाल होत असून रुग्णालयाची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करताना गौरी सावंत म्हणाल्या, केवळ डॉक्टरांची नियुक्ती दाखवून आणि त्यांचे स्वागत करून फोटो काढण्यापुरते राजकारण सुरू आहे. आमदारांची खरी जबाबदारी रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध करून देणे ही आहे. निलेश राणे यांनी एकतर त्या गायब झालेल्या डॉक्टरांना पुन्हा रुग्णालयात आणून सेवेत हजर करावे, अन्यथा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागतासाठी दिलेले पुष्पगुच्छ तरी परत आणावेत, असा टोला सौ. सावंत यांनी लगावाला आहे.

यावेळी सौ. सावंत यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकाळाचा दाखला दिला. नाईक यांच्या काळात मालवण रुग्णालयात पूर्णवेळ उपचार करणारे डॉक्टर उपलब्ध होते आणि रुग्णांना विनासायास वैद्यकीय सेवा मिळत होती. त्यावेळी रुग्णालयाबाबत नागरिकांच्या तक्रारी नव्हत्या. मात्र, सध्याच्या लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे रुग्णालयात आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर गेली असून, स्थानिक नागरिकांमध्ये आमदार निलेश राणे यांच्या कारभाराविषयी तीव्र असंतोष पसरला आहे, असे सौ. सावंत यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page