Headlines

पंचमदा यांच्या संगीतविश्वाचा कुडाळात रंगला रसास्वाद…

संदीप जोशी यांनी उलगडला आर डी बर्मन यांचा संगीत प्रवास:संत राऊळ महाराज कॉलेज मध्ये आयोजन..

⚡कुडाळ ता.२२-: येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे डोंबिवली येथील संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पंचमदा उर्फ संगीतकार आर. डी. बर्मन संगीत रसास्वाद कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले. आर. डी. बर्मन यांच्या संगीताची वैशिष्ट्ये, त्यांचे प्रयोगशील व्यक्तिमत्त्व आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान यांचा यावेळी संगीतप्रेमींनी रसास्वाद घेतला.
कार्यशाळेचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वडाच्या रोपट्याला जल अर्पण करून करण्यात आला. यावेळी स्मिता सुरवसे, प्रशांत धोंड, प्रा. मंगेश जांबळे, प्रफुल्ल वालावलकर आदी उपस्थित होते. डॉ. स्मिता सुरवसे यांनी सांस्कृतिक विभागाच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती देताना भविष्यात निवेदन कार्यशाळा घेणार असल्याचे जाहीर केले.
उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र ठाकूर यांनी केले, तर प्रा. संतोष वालावलकर यांनी संदीप जोशी यांची ओळख करून दिली. संगीत विशारद पदवी प्राप्त केल्याबद्दल विद्यार्थिनी श्रुती सावंत हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. राजगुरू मॅडम यांनी आभार मानले.

उलगडला पंचमदांचा संगीत प्रवास

‘रिमझिम गिरे सावन’ या पंचमदा यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताने संदीप जोशी यांनी कार्यशाळेला सुरुवात केली. आर. डी. बर्मन यांच्या संगीताची सर्जनशीलता उलगडताना संदीप जोशी यांनी त्यांच्या प्रयोगशील संगीतशैलीचे विविध पैलू रसिकांसमोर मांडले. निसर्गातील ध्वनींचा पंचमदा यांचा सखोल अभ्यास होता. त्यांनी कृत्रिम ध्वनींपेक्षा नैसर्गिक ध्वनींना अधिक महत्त्व दिले, असे त्यांनी सांगितले.
लयकरी आणि उपयोजित संगीत असे संगीताचे दोन प्रकार सांगताना पंचमदा हे उपयोजित संगीताचे समर्थक होते, असेही श्री. जोशी यांनी स्पष्ट केले.   आर डी बर्मन यांच्या संगीतामध्ये तबला, विविध तालवाद्ये तसेच वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचा कल्पक वापर दिसून येतो. रत्नागिरीचे तबलजी मारुती किर आणि अमृतराव यांच्यासह तब्बल १५० वादकांनी त्यांच्या संगीताला साथ दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पंचमदा हे संगीतामध्ये ‘कट्स आणि पिकअप्सचे बादशहा’ होते. पार्श्वसंगीतात त्यांनी अनेक अभिनव प्रयोग केले. शोले आणि द बर्निंग ट्रेन यांसारख्या चित्रपटांतील पार्श्वसंगीत हे त्यांच्या प्रयोगशीलतेचे उत्तम उदाहरण असल्याचे संदीप जोशी यांनी स्पष्ट केले. विविध ध्वनींचा सखोल अभ्यास करून त्यांनी सुरावटीतील वाद्यांचा लयीसाठीही प्रभावी वापर केला. तुंबासारख्या क्युबा देशातील वाद्यांना चित्रपट संगीतात स्थान मिळवून देण्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
आर. डी. बर्मन यांनी १९६६ मध्ये आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. पारंपरिकतेसोबतच नवनवीन प्रयोग करण्याची त्यांची वृत्ती आणि ध्वनींच्या वैविध्यपूर्ण वापरामुळे हिंदी चित्रपटसंगीताला नवी दिशा मिळाली. मध्ये आवश्यक गीतांची पखरण करत संदीप जोशी यांनी थोडक्यात पंचमदांचा सांगीतिक प्रवास उलगडला. कार्यशाळेच्या सांगतेवेळी ‘आनेवाला पल’ या लोकप्रिय गीताने उपस्थितांना पंचमदांच्या अविस्मरणीय संगीतविश्वाची पुन्हा एकदा अनुभूती दिली. विद्यार्थिनी श्रुती सावंत यांनीही संदीप जोशी यांना कार्यशाळेत संगीताची साथ दिली. कार्यक्रमाला संगीत रसिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page