*सिंधू सह्याद्री अँडव्हेचर क्लब अध्यक्ष गिर्यारोहक रामेश्वर सावंत यांची माहिती
*💫सिंधुदुर्गनगरी, दि.०३- :* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहसी क्रीडा पर्यटनाचा अभिनव अध्याय सुरु करणारी कावळेसाद रॅपलिंग आणि कावळसाद खोऱ्यातील जैव वैविधता संशोधन पदभ्रमंती ही साहसी मोहिम डिसेंबरच्या २६ व २७ तारखेला आयोजित केली असल्याची घोषणा “सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लब”चे अध्यक्ष व सुप्रसिद्ध गिर्यारोहक रामेश्वर सावंत यांनी आज येथे केली. याबाबत माहिती देताना श्री. सावंत म्हणाले की, आंबोली या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी ‘कावळेसाद’ हा पर्यटकांना सदैव मोहविणारा सहयाद्रीचा कातळकडा परिसर आहे. पावसाळ्यात या सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारे जलप्रपात-पाणी त्या विलोभनीय खोऱ्यातून पार शिरशिंगे गावात पोहोचते. या खोऱ्यात बहुमूल्य जैव वैविधता आहे. फार क्वचितच कुणी मानव या खोऱ्यात केव्हातरी येतो, त्यामुळे वन्यप्राण्यांचा अधिवास येथे जास्त आहे. अशा या खोऱ्यात कावळेसाद कड्यावरून पहिले अंदाजे २५० फूट खोल दरीत रॅपलिंग करीत सदस्य खाली उतरतील. तिथून थोडी उतारचाल झाल्यावर पुन्हा थोडे रॅपलिंग करतील आणि या अजस्त्र खोऱ्यात पोहोचतील. हा पहिला टप्पा पार पडल्यानंतर खोऱ्यातून इथल्या पशुपक्षी -फुलपाखरे-दुर्मिळ वनस्पती-कीटक-दगड यांचे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण करीत करीत खोऱ्यातून पदभ्रमंतीचा अविस्मरणीय साहस-आनंद अनुभवतील. दुर्मिळ क्षण कॅमेरात टिपतील, नोंदी घेतील. रात्रीचा मुक्काम अर्थातच निबिड जंगलात कॅम्पसाईट तयार करुन केला जाईल. रात्री सामूहिक जेवण बनवणे, अनुभव कथन, मार्गदर्शन, कॅम्पफायर (गप्पा-गोष्टी-गाणी) असा कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी खोऱ्यातून पुन्हा पक्षी-वनस्पती निरीक्षण करीत करीत शिरशिंगे गाठल्यावर मोहिमेचा समारोप होईल.मोहीम पूर्ण झाल्यावर या जंगलात दिसलेल्या,नव्याने आढळलेल्या पशु पक्षी,फुलपाखरे,कीटक,वनस्पती-प्रवाळ-शेवाळ याचा सविस्तर रिपोर्ट फोटोंसहित जिल्हा वनविभाग कार्यालयात सुपूर्द करण्यात येणार आहे. सह्याद्री-हिमालयातील मोहिमांचा प्रदीर्घ अनुभव असलेले या मोहिमेचे प्रमुख श्री. रामेश्वर सावंत पुढे म्हणाले की, मोहिमेचा कालावधी २६ व २७ डिसेंबर असला तरी सहभागी सदस्यांनी २५ तारखेस संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आंबोली येथे रिपोर्टिंग करावी. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता मोहीम सुरू होईल. १५ ते ५० वर्षे वयोगटाच्या स्त्री-पुरुषांना ही मोहिम खुली आहे. फक्त ४० सदस्यांना प्रथम येईल त्यास प्रथम या तत्वावर प्रवेश दिला जाईल. या माहिमेची श्रेणी मध्यम (साहसी) आहे. या मोहिमेसाठी रॅपलिंगच्या पुर्वानुभवाची आवश्यकता नाही. मात्र दाट जंगल भागात, डोंगरदऱ्यांतून आपले साहित्य घेऊन चालण्याइतकी शारिरीक क्षमता असावी. सहभागी सदस्य यांची सर्वतोपरी काळजी आणि वनविभागाच्या सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे.पदभ्रमंती मार्गात सापडून येणारा प्लास्टिक तत्सम कचरा देखील जमा करून तो आणला जाणार आहे. या मोहिमेत जैव वैविधता व वनस्पती तज्ञ सुप्रसिद्ध डॉ. बाळकृष्ण गावडे, पक्षीतज्ञ डॉ.योगेश कोळी मार्गदर्शन करणार आहेत. मोहिमेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी 9422373313 या मोबाईलवर किंवा 02367-246050 या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन “सिंधू-सह्याद्री ऍडव्हेंचर क्लब”,या गिर्यारोहण संस्थेने केले आहे.