परिवहन विभागाचे स्पष्टीकरण; अर्ज नामंजूर किंवा प्रलंबित ठेवला जाणार नाही..
⚡ओरोस ता २२-: सार्वजनिक सेवा वाहन (PSV) बॅज अथवा अथॉरायझेशनसाठी अर्ज करणाऱ्या चालकांसाठी परिवहन विभागाने महत्त्वाचा निर्णय स्पष्ट केला आहे. स्थानिक वास्तव्याचा दाखला (SEC) उपलब्ध नसल्यामुळे अर्ज प्रलंबित ठेवला जाणार नाही किंवा नामंजूर केला जाणार नाही. त्याऐवजी महाराष्ट्र शासनाकडून जारी करण्यात येणारे ‘वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र’ (Age, Nationality and Domicile Certificate) स्थानिक वास्तव्याचा वैध पुरावा म्हणून स्वीकारले जाणार आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४(२) नुसार PSV बॅज अथवा अथॉरायझेशनसाठी स्थानिक वास्तव्याचा पुरावा आवश्यक आहे. मात्र, महसूल व वन विभागाने स्थानिक वास्तव्याचा दाखला (SEC) देण्याच्या कार्यपद्धतीत बदल केल्यानंतर नागरिकांना रहिवासी प्रमाणपत्र (Residence Certificate) आणि वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जात आहे.
या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, रहिवासी प्रमाणपत्र (Residence Certificate) हे स्थानिक वास्तव्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. अर्जदारांनी ‘वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र’ सादर करणे आवश्यक असून, तेच PSV बॅज अथवा अथॉरायझेशनसाठी स्थानिक वास्तव्याचा अधिकृत पुरावा मानला जाईल.
परिवहन विभागाने हेही स्पष्ट केले आहे की, केवळ SEC उपलब्ध नसल्याच्या कारणावरून कोणाचाही अर्ज प्रलंबित ठेवला जाणार नाही किंवा फेटाळला जाणार नाही. अर्जदाराने अधिवास प्रमाणपत्रासह महाराष्ट्र मोटार वाहन नियमांनुसार आवश्यक असलेली इतर सर्व कागदपत्रे व अटी पूर्ण केल्यास त्याच्या अर्जावर नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी PSV बॅज अथवा अथॉरायझेशनसाठी अर्ज करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी या सुधारित सूचनांची नोंद घेऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन केले आहे.
