८ पदकांची कमाई; सुवर्णासह विविध स्पर्धांमध्ये चमकदार यश
⚡ओरोस, ता. २२-: रायगड जिल्ह्यातील अलीबाग येथे आयोजित २१ व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा महोत्सव–२०२६ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ८ पदकांवर नाव कोरले. यात ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि १ कांस्य पदकाचा समावेश असून विविध वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांमध्ये जिल्हा पोलिसांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.
१३ ते १५ जुलै दरम्यान झालेल्या या क्रीडा महोत्सवात पोलीस उपनिरीक्षक अविनाश चंद्रकांत पाटील यांनी Lifting and Packing तसेच स्वयंचलित पोलिस साहित्य पोलिस उपनिरीक्षक सर्वांग कौशल्य स्पर्धा आणि Police Photography या स्पर्धांमध्ये तीन सुवर्णपदके पटकावली. तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमित आकाराम राणे यांनी Anti Sabotage Check स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.
सहायक पोलीस निरीक्षक हर्षद सुनील हिले यांनी Crime Investigation, Criminal Laws, Rules, Procedure and Court Judgement तसेच Lifting and Packing या स्पर्धांमध्ये दोन रौप्यपदके मिळविली. पोलीस हवालदार राहुल शिवाजी कोळे यांनी Anti Sabotage Check स्पर्धेत रौप्यपदक, तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार निलेश निवृत्ती खोत यांनी Bomb Search and Tracking स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. या शिवाय पोलीस कॉन्स्टेबल जावेद शफिउल्ला मुल्ला यांनी Police Portrait स्पर्धेत कांस्यपदक पटकावत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या यशात भर घातली.
ही उल्लेखनीय कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच संघप्रमुख पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली साध्य झाली. स्पर्धेनंतर पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नवमी साटम यांनी सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या नावलौकिकात भर पडली आहे.
फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी: पदक विजेत्या पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर
