Headlines

माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून प्रतिमेस पुष्पांजली अर्पण

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि.२२- महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. राज्याच्या प्रशासनात त्यांनी दिलेले नेतृत्व, विकासाभिमुख दृष्टीकोन, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि जनसेवेप्रती असलेली त्यांची बांधिलकी यांचे स्मरण यावेळी करण्यात आले.

 यावेळी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, प्रत्येक अधिकाऱ्याच्या कामाचे बारकाईने परीक्षण करताना चांगले काम करणाऱ्यांचे मनापासून कौतुक करणे, ही अजितदादा यांची कार्यपद्धती होती. चांगल्या कामाला प्रोत्साहन देणे आणि गुणवत्तेची दखल घेणे, हा त्यांच्या नेतृत्वाचा महत्त्वाचा गुण होता. प्रशासनावर असलेली त्यांची भक्कम पकड, निर्णयक्षमता आणि कामातील स्पष्टता यामुळे विकासकामांना नेहमीच गती मिळाली. कोणतेही काम नियोजनबद्ध पद्धतीने, वेळेत आणि परिणामकारक रीतीने पूर्ण व्हावे, यासाठी ते सातत्याने आग्रही असत. वक्तशीरपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता. एखादे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी नियोजन, सातत्य, शिस्त आणि लोकांप्रती असलेली बांधिलकी किती महत्त्वाची असते, हे अजितदादांकडून शिकण्यासारखे आहे. त्यांचे विचार, कार्यशैली आणि जनहिताची तळमळ अनेकांसाठी कायम प्रेरणादायी राहील. अशा अभ्यासू, दूरदृष्टी असलेल्या आणि कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आठवणी आणि कार्याचा आदर्श पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असेही त्या यावेळी म्हणाल्या. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, आरती देसाई, शारदा पोवार, बालाजी शेवाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे,  जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तहसिलदार चैताली सावंत तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. 

००००००

You cannot copy content of this page