२२ सॅम बालकांना पदाधिकारी-अधिकारी घेणार दत्तक..
⚡ओरोस ता २९-: जिल्ह्यात सॅममध्ये असलेल्या २२ कुपोषित बालकांना जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकारी दत्तक घेणार आहेत. खा नारायण राणे यांच्या येऊ घातलेल्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात कुपोषित बालके राहू नयेत, यासाठी जिल्हा परिषदेने चंग बांधला असून त्यासाठी अभियान स्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच मॅम मधील ३७६ बालके सॅम मध्ये येऊ नयेत, यासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सांगितले.
सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या विविध विषयांची माहिती देण्यासाठी अध्यक्ष कामत यांनी आपल्या दालनात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपाध्यक्ष तुकाराम साईल, सभापती संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, रुहिता तांबे, जिल्हा परिषद सदस्य सावी लोके, संदीप गावडे, हे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक उगारे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना कामत यांनी ‘आम्ही जिल्हा परिषद पदाधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर खा नारायण राणे यांनी जिल्ह्यात कुपोषित बालके राहणार नाहीत, यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार १० एप्रिल २०२७ रोजी खा राणे यांचा ७५ वा वाढदिवस येत आहे. त्या निमित्ताने जिल्हा परिषदेने कुपोषणमुक्त जिल्हा करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. शून्य ते ५ वयोगटातील एकही बालक सॅममध्ये राहू नयेत, यासाठी हा प्रयत्न आहे. कुपोषित २२ मधील पाच मुले आपण अध्यक्ष या नात्याने दत्तक घेणार आहोत. खा राणे यांचे नातू अभिराज राणे दोन मुले दत्तक घेणार आहेत. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, अन्य पदाधिकारी आणि अधिकारी उर्वरित बालके दत्तक घेणार आहेत, असे कामत यांनी सांगितले.
या कुपोषित मुलांना महिला व बालकल्याण विभागाकडून मिळणारा नियमित लाभ मिळतच राहणार आहे. त्यांची नियमित आरोग्य तपासणी होणार आहे. या पलीकडे जाऊन जिल्हा परिषद कुपोषणमुक्त जिल्हा अभियान अंतर्गत काळजी घेणार आहे. दत्तक घेणाऱ्या व्यक्ती लागणारी मदत त्यांना करणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून २२ ही मुले कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या शिवाय मॅम मध्ये असलेल्या ३७६ मुलांकडे सुद्धा विशेष लक्ष दिले जाणार आहेत. ही मुले अत्यंत सुदृढ बनावीत. ती सॅम मध्ये जाऊ नयेत, याची काळजी घेतली जाणार असल्याचे यावेळी कामत यांनी सांगितले.
