⚡कणकवली ता.२८-: पायाला गंभीर दुखापत झाल्यानंतर वेदनांशी झुंज देत असलेल्या महेश दिगंबर वाघमारे (पडी) याच्यासमोर उपचारांचा खर्च हे मोठे आव्हान उभे राहिले होते. एका सामान्य कुटुंबातील महेश यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे पुढील उपचार कसे करायचे, हा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांसमोर निर्माण झाला होता. महेश यांच्या परिस्थितीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचली आणि मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले. सामाजिक, राजकीय आणि मित्रपरिवारातील अनेकांनी पुढाकार घेत महेश यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहकार्य केले. संकटाच्या काळात समाजाने दाखविलेली ही एकजूट महेश आणि त्यांच्या कुटुंबासाठी दिलासादायक ठरली.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन डोंगरे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. धनंजय रासम आणि डॉ. सर्वेश ताशेटे यांनी महेश (पडी) याच्या पायावर आवश्यक उपचार सुरू केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे त्याला योग्य उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमानंतर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन महेश (पडी) याची भेट घेतली. त्यांनी महेश ची प्रकृती जाणून घेत कुटुंबीयांशी संवाद साधला. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आणि प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन डोंगरे यांना उपचारांबाबत विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. “उपचारासाठी आणखी कोणतीही मदत लागली तर नक्की सांगा,” असा कुटुंबप्रमुखाप्रमाणे शब्द देखील पालकमंत्री नितेश राणे यांनी कुटुंबीयांना दिले. संकटाच्या काळात मिळालेला हा आधार महेश च्या कुटुंबासाठी आशेचा किरण ठरला आहे.
एकीकडे वेदनांशी लढणारा महेश आणि दुसरीकडे त्याच्या मदतीसाठी एकवटलेला समाज… या प्रसंगाने माणुसकी अजूनही जिवंत असल्याची प्रचिती पुन्हा एकदा दिली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी, प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन डोंगरे, डॉ. माधव उबाळे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण, कळसुली सरपंच सचिन पारधीये आदी उपस्थित होते.
