Headlines

माजगावच्या शेतकऱ्यांच्या नकाशांसाठी उपोषण यशस्वी…

दोन महिन्यात नवीन नकाशे देण्याचे प्रशासनाचे लेखी आश्वासन..

सावंतवाडी:
तालुक्यातील माजगाव येथील खातेदार शेतकऱ्यांच्या जमिनींचे नकाशे जीर्ण झाल्यामुळे उपलब्ध होत नाही याबाबत वारंवार येथील महसूल व भूमी अभिलेख कार्यालयाला विनंती अर्ज करूनही यावर काहीच हालचाली होत नसल्याने माजगाव ग्रामस्थांनी आज माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडले. या सर्व प्रकाराला संबंधित अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. अखेर तहसीलदार श्रीधर पाटील तसेच भूमि अभिलेखचे उपाध्यक्ष विनायक ठाकरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत नकाशा संदर्भात ग्रामस्थांची मागणी लक्षात घेत वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केल्यानंतर आवश्यक तरतुदींच्या अनुषंगाने दोन महिन्यात नव्याने नकाशे दिले जातील असे लेखी पत्र दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
​माजगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचे नकाशे जीर्ण झाल्याने व फाटल्याने भूमी अभिलेख कार्यालयाकडून ते उपलब्ध करून दिले जात नाहीत, परिणामी शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची हद्द निश्चित करता येत नाही. तसेच अवकाळी पाऊस, अतिवृष्टी किंवा वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी जेव्हा शासकीय स्तरावर प्रस्ताव मागवले जातात, तेव्हा नकाशा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे शासकीय मदत व नुकसान भरपाईचे प्रस्ताव फेटाळले जातात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. संबंधित कागदपत्रांनुसार, सन २००० मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा झाल्यापासून, म्हणजेच गेली २४ वर्षे माजगाव येथील ग्रामस्थ या संदर्भात वारंवार लेखी व तोंडी स्वरूपात भूमी अभिलेख कार्यालयाकडे विनंत्या करत आहेत. सन २००२ मध्ये शासनाच्या समाधान योजनेतही हा प्रस्ताव मांडण्यात आला होता, परंतु अद्यापपर्यंत यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. सावंतवाडी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून ग्रामस्थांना उडवाउडवीची आणि खोडसाळ उत्तरे दिली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.
​या प्रशासकीय अनास्थेविरोधात छेडण्यात आलेल्या या उपोषणाला राजकीय नेत्यांसह ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळाला. उपोषणस्थळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, सुदन कवठणकर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, तसेच माजगावच्या सरपंच रंजना कानसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी सरपंच संजय कानसे, दिनेश सावंत, अजय सावंत, आणि चराठा गावच्या सरपंच प्राची कुबल यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला. दरम्यान, उपोषण स्थळी तहसीलदार श्रीधर पाटील तसेच भूमी अभिलेखचे उपअधीक्षक विनायक ठाकरे यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. जोपर्यंत जीर्ण झालेले ६० टक्के गावातील नकाशे सुस्थितीत नव्याने होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्धार ग्रामस्थांनी बोलून दाखवला.​यावर झालेल्या सविस्तर चर्चेत माजगाव येथील एकूण ३२० भूमापन क्रमांकांपैकी ११४ क्रमांकांचे नकाशे सुस्थितीत असून उर्वरित सर्व जीर्ण नकाशे पुनर्गठित करण्यासाठीचा सविस्तर अहवाल १० जुलै २०२६ पर्यंत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर केला जाईल. तेथून हा प्रस्ताव मुंबई येथील उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठवून, मंजुरीनंतर सर्व हितसंबंधितांना नोटीस देऊन ६० दिवसांत मोजणी पूर्ण करुन नवीन अद्ययावत नकाशे जनतेसाठी ग्रामपंचायतीत उपलब्ध केले जातील, असे लेखी आश्वासन देण्यात आले. या ठोस लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. सकाळी सुरू केलेल्या या आंदोलनाला ग्रामस्थांचा चांगला पाठिंबा मिळाला सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. ​या आंदोलनात अर्जुन सावंत, अमोल वेजरे, पुरुषोत्तम कानसे, तुळशी सावंत, लक्ष्मण सावंत, प्रल्हाद मेस्त्री, जयवंत कानसे, जितेंद्र नाईक, विनोद जाधव, विलास दळवी, अशोक बुरूड, आबा सावंत, श्याम कासार, विशाखा जाधव, सुरेश कासार, विनोद तळेकर, सच्चिदानंद सावंत, गोपाळ तळेकर, चंद्रकांत कुबल यांच्यासह माजगाव येथील बहुसंख्य ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page