Headlines

विध्यार्थ्यानी संस्कार आणि तंत्रज्ञान यांचा समतोल साधावा…

ऍड. संग्राम देसाई :एसआरएम कॉलेजचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा :मान्यवरांनी जागविल्या महाविद्यालय उभारणीच्या आठवणी..

कुडाळ : आपले आईवडील, गुरुजन यांचे आपल्यावर झालेले संस्कार आणि आजचे आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल साधलात तर जीवनात नक्की यशस्वी व्हाल, असं प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ तथा महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य संग्राम देसाई यांनी केलं. येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या ४२ व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित संत राऊळ महाराज महाविद्यालयाची शुभारंभ होऊन आज ४२ वर्ष पूर्ण झाली. महाविद्यालयाचा ४२ वा वर्धापन दिन आज महाविद्यलयाच्या श्री. एकनाथ ठाकूर सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कमशिप्र मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वर्धापन दिन सोहळ्यासाठी व्यासपीठावर ज्येष्ठ विधिज्ञ तथा महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य संग्राम देसाई, कामशिप्र मंडळाचे उपाध्यक्ष का. आ. सामंत, सरकार्यवाह अंनत वैद्य, प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे उपस्थित होते. ऍड. संग्राम देसाई यांच्या हस्ते देवी सरस्वतीला पुष्पहार अर्पण करून आणि ऍड. देसाई यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी उपस्थितांचे स्वागत रोपटे देऊन केले. तसेच ऍड. संग्राम देसाई यांचा अरविंद शिरसाट यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. ऍड. संग्राम देसाई यांचा परिचय डॉ. रवींद्र ठाकूर यांनी करून दिला.
संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सुंदर अशा ‘भरारी’ या वार्षिकांकाचे ऍड. संग्राम देसाई यांनी प्रकाशन केले. संपादक डॉ. भारत तुपेरे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. कॅप्टन एस.टी. आवटे, डॉ. शरयू आसोलकर, डॉ. साईनाथ लोखंडे, प्रा. संतोष वालावलकर या संपादक मंडळाने या वार्षिकांकासाठी काम केले आहे. याचे आकर्षक असे मुखपृष्ठ प्रा. संतोष वालावलकर यांच्या संकल्पनेतून साकार झालं आहे. संपादक डॉ. भारत तुपेरे यांनी भरारी अंकाविषयी माहिती दिली.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी आपल्या प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील एक अग्रगण्य महाविद्यालय असल्याचे डॉ. सुरवसे यांनी यावेळी सांगितले.
ऍड. संग्राम देसाई यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थीदशेत असताना ज्या गुरुजनांसमोर उभे राहण्याची सुद्धा हिम्मत नव्हती त्याच गुरुजांसमवेत व्यासपीठ शेअर करायला मिळणे हा आपल्यासाठी खूपच भावुक क्षण असल्याचे ऍड. देसाई यांनी सांगितले. ज्या संस्थेचे हे कॉलेज आहे त्याच संस्थेच्या कुडाळ हायस्कुलचा विद्यार्थी असल्याचा अभिमान असल्याचे ऍड. देसाई यांनी आवर्जून सांगितले. आजच्या काळात जर यशस्वी व्हायचे आले तर आपले पालक, गुरुजन यांनी केलेले संस्कार आणि तंत्रज्ञान यांचा योग्य समतोल साधायला शिका असा सल्ला ऍड. देसाई यांनी दिला. झाड जमिनीच्या बाहेर वाढलेले दिसते. फळा फुलांनी डवरलेले दिसते पण जमिनीखाली त्याची मुळे पाण्याच्या शोधात दगड-मातीतून खोल गेलेली असतात. त्यामुळे पण सुद्धा आपली शाळा, कॉलेज, शिक्षक, आईवडील यांना विसरू नका असे आवाहन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांवरून बोलताना अरविंद शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या उभारणीचा इतिहास विशद केला. आपल्या काही आठवणी उपस्थितांशी शेअर केल्या. गुरुवर्य का आ सामंत यांनी देखील शाळा आणि कॉलेजच्या आठवणी सांगितल्या. कॉलेजच्या स्थापनेचा इतिहास मुलांना सांगितला. अनंत वैद्य यांनी देखील आपल्या मिश्किल शैलीत आजच्या विद्यार्थयांनी कसे वागले पाहिजे याची त्यांना जाणीव करून दिली. काळासोबत चालतानाच वेगवेगळे अभ्यासक्रम शिका. तुमचे कॅरेक्टर ओळखा आणि तसे वागा असा सल्ला नवोदित विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी केदार सामंत, प्रतिभा पाटणकर, सुरेश चव्हाण, निवृत्त प्राध्यापक डॉ. अनंत लोखंडे, निवृत्त प्राध्यापक प्रा. ऍड. अरुण पणदूरकर, कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, माजी विद्यार्थी संघाच्या खजिनदार सौ. जयन्ती कुलकर्णी, गुणवत्ता हमी कक्षाचे सदस्य श्रीकांत बेलसरे, सेवानिवृत्त कर्मचारी मोहन मांजरेकर, पी. एस. सावंत, सुधाकर घोगळे, कॉलेजचे कर्मचारी, माजी विद्यार्थी, विद्यार्थी, प्राध्यापक, पालक मोठयासंख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कमलेश चव्हाण, डॉ. रवींद्र ठाकूर, प्रा. सबा शहा यांनी केले. तर आभार डॉ. रवींद्र ठाकूर यांनी मानले.

You cannot copy content of this page