“त्या” तीन सफाई कामगारांचे थकित पगार देण्याची तात्काळ कार्यवाही न केल्यास आंदोलन- महेश जावकर

*💫मालवण दि.०२-:* कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर मालवणच्या ग्रामीण रुग्णालयाला ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिने कालावधीसाठी श्री राम समर्थ सुशिक्षित बेरोजगार संस्थेने ठेकेदारी पद्धतीने तीन सफाई कामगार पुरविल्यानंतर या कामगारांचा पगार देण्याच्यादृष्टीने जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे निधीची बिले सादर करूनही जिल्हा आरोग्य विभागाने ती थकीत ठेवल्याने या कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे या कामगारांचा पगार होण्याबाबत आरोग्य विभागाने तातडीने कार्यवाही न केल्यास मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयात कोव्हिड कालखंडात साफसफाईचे काम करण्यासाठी श्री राम समर्थ सुशिक्षित बेरोजगार संस्थेकडून रुग्णालयाने ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यासाठी तीन सफाई कामगार ठेकेदारी पद्धतीने घेतले होते. या कामगारांनी कोविड महामारीच्या संकट काळात जीवावर उदार होऊन काम सफाईचे काम केले. या सफाई कामगारांच्या ऑगस्ट, सप्टेंबर ऑक्टोबर अशा तीन महिन्याच्या पगाराची बिले संस्थेने मालवण ग्रामीण रुग्णालय प्रशासनास सादर केली. रुग्णालयाने ही बिले मंजुरीसाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे पाठविली. मात्र पगाराची बिले अद्याप दिली गेली नसल्याने कामगारांची दिवाळीही उपासमारीत गेली आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या जवळ मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोवीड महामारी कालखंडात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आम्हा कामगारांवर अन्याय का केला जात आहे ? असा प्रश्न सफाई कामगारांनी उपस्थित केला आहे. याबाबत मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे कामगारांचा पगार अद्याप न मिळल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करण्याचा इशारा जावकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page