नगरपंचयातच्या सत्तेत आल्यानंतर सहा महिन्यांत विकासकामांना गती:नगराध्यक्ष संदेश पारकर यांची पत्रकार परिषदेत माहिती..
⚡कणकवली ता.२१-: कणकवली नगरपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन रविवारी २१ जून रोजी सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या सहा महिन्यांतील विकासकामांचा आढावा मांडला. शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले असून येत्या काळात मोठ्या प्रमाणात विकासकामांना गती मिळणार असल्याचा विश्वास नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केला.
कणकवली नगरपंचायत येथे आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष संदेश पारकर बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक लुकेश कांबळे, दीपिका जाधव, जाई मुरकर, सत्यजित पारकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
२१ डिसेंबर १०२५ रोजी कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागून नगरपंचायतीत सत्तांतर झाले होते. विशेष म्हणजे त्या दिवशी रविवार होता आणि सहा महिने २१ जून रोजी पूर्ण होत असल्याचे सांगत श्री. पारकर यांनी या सहा महिन्यांच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
नगराध्यक्ष पारकर म्हणाले की, नगरपंचायतीचा अर्थसंकल्प सुमारे ५८ कोटी रुपयांचा असून विविध शासकीय योजनांतून शहरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नवरत्न अभियान, आमदार निधी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, पंधरावा वित्त आयोग, पर्यटन विकास निधी आणि रस्ता अनुदान अशा विविध माध्यमांतून सुमारे १७ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे.
गेल्या सहा महिन्यांत महिला स्वच्छता यंत्राचे लोकार्पण करण्यात आले असून निमेवाडी – सुतारवाडी येथे एक कोटी रुपयांच्या खर्चातून श्री स्वयंभू नमो उद्यान उभारण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४० घरांना मंजुरी मिळाली असून काही घरकुलांची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. शहरातील विविध विकासकामांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, निम्मेवाडी स्मशानभूमी, नाथ पै नगर, गणपती साना, कनकनगर, ब्राह्मणदेव मंदिर परिसर तसेच इतर विकासकामांच्या वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत. जवळपास १४ विकासकामे प्रत्यक्षात सुरू होण्याच्या टप्प्यात असून लवकरच त्यांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
कणकवली शहरातील क्रीडांगणासाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. जलतरण तलाव प्रकल्प, अग्निशामन केंद्र, नवीन पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना आणि पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आरक्षण क्रमांक २३ मधील उद्यानासाठी जागेची मोजणी पूर्ण झाली असून पुढील प्रक्रिया वेगाने राबविली जात आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाखालील जागेच्या सुशोभीकरणासाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी २० लाख रुपयांच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. तसेच श्रीधरराव नाईक चौक ते मंजुनाथ हॉटेल परिसरातील उड्डाणपुलाखाली ‘स्मार्ट ब्रिज’ संकल्पना राबविण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. त्याचे काम सुरू आहे.
कलमठ ग्रामपंचायतीला एप्रिल महिन्यापासून दररोज सुमारे चार लाख लिटर पाणी पुरवठा केला जात असल्याची माहितीही नगराध्यक्ष श्री. पारकर यांनी दिली. कणकवली शहरातील अग्निशामन केंद्रासाठी स्वतंत्र प्रकल्प राबविण्याचे नियोजन असून त्याचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी राज्य शासनाकडे मोठ्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
त्याचबरोबर नवीन नळपाणी योजना, भुयारी गटार योजना आणि पावसाळी पाणी निचरा यासाठी सुमारे १२० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यामध्ये नळपाणी योजनेसाठी सुमारे ५० कोटी रुपये, भुयारी गटार योजनेसाठी ३५ कोटी रुपये तसेच पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी स्वतंत्र निधीची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी २५ कोटी रुपये, सुसज्ज नाट्यगृह उभारण्यासाठी २५ कोटी रुपये तसेच एसटी स्थानक परिसरात अत्याधुनिक प्रसाधनगृह उभारण्यासाठी अडीच कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १०२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात दर गुरुवारी गावठी बाजार सुरू करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात असून नागरिकांना स्थानिक उत्पादने विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे श्री. पारकर म्हणाले.
तसेच पूर्वी रद्द करण्यात आलेल्या २१ विकासकामांच्या निविदा पारदर्शक पद्धतीने नव्याने काढण्यात येणार असून त्यांची कामेही लवकरच सुरू होतील, असे पारकर यांनी स्पष्ट केले. नगरपंचायत प्रशासन, नगरसेवक, नगरसेविका, उपनगराध्यक्ष तसेच विरोधी पक्षाच्या सहकार्यामुळे विकासकामांना गती मिळाल्याचे देखील श्री. पारकर यांनी सांगितले.
स्वच्छ, सुंदर, शिस्तप्रिय आणि विकासाभिमुख कणकवली घडविण्याचा आमचा संकल्प आहे. नागरिकांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केला.
