Headlines

सिंधुरत्न योजनेअंतर्गत मच्छिमारांच्या बळकटीकरणासाठी सुधारणा कराव्यात…

रामेश्वर मच्छिमार सोसायटीची मागणी..

⚡मालवण ता.१२-:
सिंधुरत्न समृध्द योजना ही पथदर्शी योजना सन २०२६ – २७ ते २०२८-२९ साठी राबविण्याचे काम मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सुरु आहे. परंतु योजनेच्या प्रस्तावांमध्ये मच्छिमारांच्या बळकटीकरणासाठी काही सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी मालवण दांडी येथील श्री रामेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटीतर्फे सहाय्यक मत्स्यव्यावसाय आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

मालवण येथील मत्स्य विभाग कार्यालयात सहाय्यक मत्स्यव्यावसाय आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी श्री रामेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जगदीश खराडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुरत्न योजनेअंतर्गत ट्रॉलिंग नौकाधारकांसाठी नौका बळकटीकरण आहेच, परंतु त्यात नवीन योजना म्हणून ट्रॉलिंग नौकेसाठी लागणारे साहित्य उदा. डिझेल बॅरल, मासे वाहतूकीसाठी टफ, तसेच नवीन इंजिन खरेदी यासाठी या योजनेअंतर्गत अनुदान मिळावे. आउटबोर्ड नौकाधारकांसाठी इंजिन खरेदी या योजनेत समाविष्ट आहेत. परंतु त्याचबरोबर जाळी ओढणारे यंत्र म्हणजेच बूम खरेदी तसेच पाच वर्षे होवून गेलेल्या नौकेस बळकटीकरण करण्यासाठी अनुदान मिळावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच रापण संघासाठी नवीन नौका खरेदीसाठी तसेच रापण संघासाठी ५०० ते ६०० किलो जाळी खरेदीसाठी अनुदान मिळावे. तसेच मच्छि विक्रेत्या महिलांसाठी मच्छि विकी करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यावर अनुदान मिळावे. संस्थेने मांडलेल्या सर्व योजना पुन्हा सुरु होणाऱ्या सिंधुरत्न समृध्द योजनेमध्ये समाविष्ट करुन घेण्यात याव्यात. सिंधुरत्न समृध्द योजना सुरु झाल्यानंतर ही योजना राबविताना संस्थेच्या कियाशील सभासदांसाठीच राबविण्यात यावी. तसेच मच्छिमार संस्थांच्या शिफारशी शिवाय प्रस्ताव घेण्यात येवू नये, अशी मागणीही करण्यात आली.

You cannot copy content of this page