मांगेली परिसरातील ग्रामस्थांत चिंता..
⚡दोडामार्ग ता.१३-: तालुक्यातील खोकरल धार ते मांगेली कुसगेवाडी आणि देऊळवाडी दरम्यान उभारण्यात आलेल्या ११ केव्ही वीजवाहिनीच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या वीजवाहिनीचे काही लोखंडी खांब पहिल्याच पावसात झुकल्याचे निदर्शनास आल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर वीजवाहिनी रस्त्यालगत उभारण्यात आली असून अनेक ठिकाणी खांब कललेल्या अवस्थेत दिसत आहेत. खांब उभारणी करताना आवश्यक तांत्रिक निकषांचे पालन झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहने आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. पावसाळ्यात जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे झुकलेले खांब कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी घटना घडल्यास जीवित व वित्तहानी होण्याचा धोका असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
काही महिन्यांपूर्वीच हे काम पूर्ण झाले असतानाही खांबांची झालेली ही अवस्था चर्चेचा विषय ठरत आहे. कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत असून संबंधित ठेकेदाराच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
महावितरण प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून झुकलेल्या खांबांची दुरुस्ती व मजबुतीकरण करावे. तसेच संपूर्ण कामाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मांगेली परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे
