महागाई, गॅस टंचाई व इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक…

सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांवर तहसीलदार-प्रांत यांना निवेदन; आमदार दीपक केसरकर यांचा ही केला निषेध..

⚡सावंतवाडी ता.१० : वाढती महागाई, गॅस सिलेंडर दरवाढ, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील निष्क्रिय आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या भूमिकेचाही निषेध करण्यात आला.
गगनाला भिडलेल्या गॅस सिलेंडरच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे घरगुती बजेट कोलमडले असून महिला वर्ग विशेषतः त्रस्त झाला आहे. महिनाभर उशिराने गॅस सिलेंडर उपलब्ध होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले असून सर्वसामान्य जनता महागाईच्या झळा सहन करत असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची शेतीकामे सुरू होत असून लहान शेती यंत्रांसाठी पेट्रोल-डिझेलची आवश्यकता भासत आहे. मात्र इंधन सहज उपलब्ध होत नसल्याने पेट्रोल पंप चालकांना कॅनमधून इंधन देण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला व सामान्य जनता सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात असल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी मतदारसंघातील डोंगर भागात सुरू असलेल्या अवैध माती उत्खनन तसेच तिलारी धरण परिसरातील अवैध गांजा शेती लागवडीबाबतही गंभीर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक तालुक्यात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, जेष्ठ नेते दिलीप नार्वेकर, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, युवक जिल्हाध्यक्ष किरण टेबूलकर, ओबीसी सचिव अमिदि मेस्त्री, राजेंद्र मसुरकर, नागेश मोरये, अजिंक्य गावडे, मेघनाद धुरी, रवींद्र उर्फ बाब्या म्हापसेकर, कृष्णा उर्फ बाळा धाऊसकर, समीर वंजारी, सुमेधा सावंत, संजय लाड, भाई जेठे, प्रणाली नाईक, माजी नगरसेविका सुमेधा धुरी, सौ. नेवरेकर यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page