वाडातर घरफोडीचा अवघ्या काही दिवसांत छडा…

पाच लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त, संशयित गजाआड..

⚡देवगड ता.०९-:
वाडातर येथील एका घरफोडी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत देवगड पोलिसांनी चोरीस गेलेले सुमारे पाच लाख रुपये किमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले असून या प्रकरणातील एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाडातर येथील रहिवासी प्रतिभा प्रदीप चोपडेकर (वय ६८) यांनी ४ जून रोजी देवगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १ जून रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० या कालावधीत त्या वाडातर खाडी परिसरात कालवे व मुळे काढण्यासाठी गेल्या असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील सुमारे पाच तोळे वजनाचे, अंदाजे पाच लाख रुपये किमतीचे तीन पदरी सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले होते.
या घटनेप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५, ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ आशिष कदम यांनी तांत्रिक तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे वाडातर येथील सिताराम धनाजी भाबल (वय ३०) याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
पुढील तपासात आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे पाच लाख रुपये किमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव तसेच पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोहेकॉ आशिष कदम, गणपती गावडे, संतोष नाटेकर, प्रतिक जाधव, रविंद्र महाले आणि नितीन डोईफोडे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ आशिष कदम करीत आहेत.

You cannot copy content of this page