*💫सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* कोचरे येथे दोन वर्षांपूर्वी बीएसएनएल मोबाइल टॉवर मंजूर होवून तसेच भूमिपूजन होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला तरी अद्याप या टॉवर चे काम सुरू न झाल्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत .येथील मोबाईल टॉवर तात्काळ कार्यान्वित करावा. या मागणीसाठी कोचरे येथील ग्रामपंचायत सदस्य योगेश तेली यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र, जिल्हा प्रबंधक यानी उपोषण स्थळी भेट देत १५ दिवसांत काम सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.
वेंगुर्ला तालुक्यातील कोचरे गावांमध्ये नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांचे लक्ष वेधून हा बीएसएनएल टॉवर मंजूर करून घेण्यात आला होता. या टॉवरला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली मात्र जागेअभावी हे काम रखडले होते. गावाची गरज व हित लक्षात घेता स्वतः योगेश तेली यांनी मोबाईल टॉवर साठी जागा उपलब्ध करून दिली. व सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून डिसेंबर २०१८ मध्ये सदर बीएसएनएल मोबाईल टॉवरचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले .परंतु आज पर्यंत गेल्या दीड दोन वर्षे होऊनही काम पूर्ण करण्यात आलेले नाही. मोबाईल टॉवर चे काम पूर्ण करून तात्काळ कार्यान्वित करावा. यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. प्रत्येक वेळी काही दिवसात काम चालू होईल अशी आश्वासने देण्यात आली. कोरोना महामारी चे कारण सांगून कामात चालढकल केली जात आहे. कोचरा गावात नेटवर्क नसल्याने गावात कुणी आजारी पडल्यास वाहन उपलब्ध करण्यासाठी संपर्क होत नाही. रास्त दराच्या धान्य पुरवठ्यासाठी वापरण्यात येणारी डिजिटल प्रणाली तसेच सद्यस्थितीत सुरू असलेली शिक्षण प्रणाली अथवा गावातील शासकीय कार्यालयाकडून मिळणारे दाखले यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. गावात नेटवर्क नसल्याने आपत्कालीन व नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास शासकीय यंत्रणेशी संपर्क करता येत नाही .त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत सदस्य याना ग्रामस्थांचा रोष पत्करावा लागत आहे. तरी गेली दोन वर्षे रखडलेले बी एस एन एल मोबाईल टॉवरचे काम तात्काळ पूर्ण करून हा मोबाईल टॉवर कार्यान्वित करावा. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर योगेश तेली यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाला कोचरे सरपंच साची फणसेकर, सदस्य प्रतिक्षा पाटकर, सरस्वती राउल , पूजा गोसावी,यांनी उपोषणाला उपस्तित राहुन सक्रिय पाठिंबा दिला आहे .आणि जोपर्यंत मोबाईल टॉवर सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील. असा निर्धार त्यांनी केला आहे.