⚡वेंगुर्ला ता.२३-: संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यातील मुख्य रस्ता दुतरफा असलेले धोकादायक दगड -माती त्वरित हटविण्याचे आदेश वेंगुर्ला पंचायत समिती मासिक सभेत उपसभापती सचिन देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला व उपस्थित अधिकाऱ्यांना शुक्रवारी (22 मे ) दिले होते. परंतु याकडे संबंधित विभागाचे अधिकारी यांनी कोणतीही हालचाल केली नसल्याचे स्पष्ट होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी / कुडाळ कडे जाणारा महत्वाचा मार्ग असूनही या भागाचा चार्ज असलेले सा. बां. विभागाचे अभियंता राहुल अडोळे यांचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. तसेच सावंतवाडी कडे जाणारा मुख्य मार्ग असूनही संबंधित नेमलेल्या ठेकेदारामार्फत रस्तानजिक गवत साफ करणे, वळणावरील झाडी कटिंग करण्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. मठ टाकयेवाडी, मठकरवाडी, बोवलेकरवाडी, ठाकूरवाडी, आडेली खुटवळवाडी, आडेली जांभरमळा, आडेली पोस्ट स्टॉप वळण, वजराट तिठा नजिक, कामळेवीर हुन सावंतवाडी कडे जाणाऱ्या मुख्य मार्गांनजिक दुतरफा असलेली झाडी संबंधित नेमलेल्या ठेकेदाराने किती वेळा कटिंग केली, याबाबत वाहनधारकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पावसाळा तोंडावर आला असूनही मठ कुडाळतिठा ते कामळेवीर आदी एरियात गतवर्षी मोडून पडलेली आकेशिरा खोड, झाडांच्या फ़ांद्या अगदी साईडपट्टीवर पडून आहेत. याच मार्गांवर मागील कालावधीत आडेली पोस्ट स्टॉप वळणावर, मठ कुडाळतिठा, मठकरवाडी, वेशी भटवाडी वळणावर अपघात होऊन चार युवकांचे बळी गेले आहेत. परंतु दळणवळणाचा मुख्य मार्ग असूनही या एरियात सा. बां. विभागामार्फत कोणतीही मान्सूनपूर्व झाडी कटिंग, साईडपट्टी, गटार स्वच्छता कामे झालेली नाहीत. ” रस्ता कामगार ” पद्धत बंद केल्याने दरवर्षी वाहनधारकांना याचा फटका बसत आहे व याचे शासनाला कोणतेच गांभीर्य नाही का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. पावसाळ्यात मुख्य रस्त्यावर झाडे पडल्यानंतर संबंधित कार्यक्षेत्रातील जेसीबीधारक यांची ‘मेहरबानी’ होत असल्याने झाडी कटिंग बाबत व धोकादायक स्थिती बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे ‘जबाबदार अधिकारी’ पूर्णपणे ‘ आलबेल ‘ असल्याचे स्पष्ट होत आहे.
याबाबत शासनाने मुख्य मार्ग असल्याने त्वरित गांभीर्याने लक्ष पुरवावे, अशी मागणी वाहनधारक यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
वेंगुर्ला उपसभापती सचिन देसाई यांच्या आदेशाचे सा. बां. विभाग अधिकाऱ्यांकडून तंतोतंत पालन ?
