राजसत्ता विठ्ठलादेवीचा कुंदेत 18वा वर्धापन सोहळा उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.२१-: कुंदे (ता. कुडाळ) येथील आदिशक्ती स्वरूपा श्री राजसत्ता विठ्ठलादेवीचा मंदिर जिर्णोद्धाराचा 18 वा वर्धापन दिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
माता विठ्ठलादेवी हा आदिशक्ती दुर्गा किंवा पार्वतीचा एक अवतार मानला जातो. कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गावात तिची स्थापना उघड्यावर, डोंगरावर किंवा देवराईत केलेली आढळते. कुंदे गावातील नदीकिनारी असलेल्या मंदिरात विठ्ठलाई देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती असून ती खड्ग, डमरू, त्रिशूळ आणि अमृतपात्र धारण करणारी आणि वाघावर आरूढ आहे. विठ्ठलाई देवी ही भक्तांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे.
कुंदे गावातील गावडेवाडी येथील आई विठ्ठलादेवी देवस्थान हे शेकडो वर्ष पुरातन देवस्थान असून सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध नवसाला पावणारी देवी असे महात्म्य आहे. या पवित्र देवस्थानाचा मंदिर जिर्णोद्धाराचा 18वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला. देवीच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.
या सोहळ्यानिमित्त सकाळी श्री विठ्ठलादेवीच्या मूर्तीवर अभिषेक, श्री विठ्ठलादेवीची महापूजा, महाआरती, महाप्रसाद, महिलांचे हळदी-कुंकू, आरोग्य शिबिर आदी कार्यक्रम झाले. देवीची ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे, आदी कार्यक्रम करण्यात आले. सायंकाळी गावातील स्थानिकांचा भजनांचा कार्यक्रम झाला. रात्री अमृतनाथ पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा ‘गजमुख विघ्नेश्वर’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रमांना भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आरोग्य शिबिराचासुद्धा उपस्थितांनी लाभ घेतला.
फोटो:-
कुंदे येथील श्री राजसत्ता विठ्ठलादेवी.

You cannot copy content of this page