पंचायत समिती बैठकीत कर्मचाऱ्याचा ‘मटका’ कारनामा व्हायरल…

लोकहिताच्या चर्चेदरम्यान मोबाईलवर आकडे पाहण्यात गुंतला कर्मचारी; सभापती व उपसभापतींकडून कारवाईचे संकेत..

⚡सावंतवाडी ता.२१-: पंचायत समितीच्या बैठकीत लोकहिताच्या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा सुरू असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा एक जबाबदार कर्मचारी आकडेमोड करण्यात व्यस्त होता.‌ मोबाईलवर ‘मटक्याचे आकडे’ पाहण्यात तो मग्न असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंद्याघ्या विरोधात घेतलेल्या कडक भूमिकेनंतर शासनातील कुंपण ‘हाप्ते’ खात असल्यानेच पुन्हा एकदा अवैध धंदे डोकं वर काढत आहेत. याचाच प्रत्यय आज सावंतवाडीच्या बैठक शासकीय कर्मचाऱ्याच्या रूपाने पहायला मिळाला.

बैठकीत लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित असताना गंभीर विषयावर सभागृहात गंभीर चर्चा सुरू असताना बांधकामचा एक कर्मचारी मोबाईल ढवळत बसला होता. मोबाईलवर तो थेट मटक्याचे आकडे तपासत असल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे. त्याचा हा कारनामा मोबाईल कॅमेऱ्यात अचूक कैद करण्यात आला. कर्तव्यावर असताना मटका पाहणाऱ्या या अधिकाऱ्याचा व्हिडिओ आता सर्वत्र वेगाने व्हायरल होत आहे.

दरम्यान, यावर सभापती सुस्मिता जाधव व उपसभापती गौरव मुळीक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठक नुकतीच संपली असून याबाबतची चर्चा खातेप्रमुखांशी करून योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती सभापती श्रीम. जाधव‌ यांनी दिली. तर ही विकृती आजच ठेचली जाईल, संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून आजच्या आज निर्णय घेतला जाईल. सभा सुरु असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मोबाईल वापरण्यास बंधन घालण्यात आल्याचेही उपसभापती गौरव मुळीक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता अंगद शेळके यांना विचारले असता, संबंधित व्यक्ती ही आपल्या विभागातील कर्मचारी आहे. त्यांच्याकडून याबाबत खुलासा मागितला असून वरिष्ठांकडून पुढील कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. पं.स. बैठकीतील या प्रकारामुळे सामाजमाध्यमांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. खाकीतील चिरीमिरी अन् राजकीय पक्षांचा अवैध धंद्याना असणारा छुपा पाठिंबाच या अवैध धंदेवाईकांना खतपाणी घालत असल्याने ही कीड जिल्ह्यात जीवंत आहे, अशी भावना समाजातून व्यक्त होत आहे. याचा प्रत्यय आजच्या पंचायत समिती बैठकीत आला असून या प्रकरणात प्रशासनाकडून कोणती ठोस कारवाई केली जाते ? याकडे जिल्ह्याच लक्ष लागून राहिले आहे.

You cannot copy content of this page