अत्याधुनिक नेत्र तपासणी वाहनाचे २८ मे रोजी लोकार्पण…

नव सिंधुदुर्गच्या लाभार्थ्यांना साड्या व टी-शर्टचे वाटप; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन..

सावंतवाडी, ता.२१: भटवाडी येथील नव नेत्र रुग्णालयाच्या सेवेत आता अत्याधुनिक नेत्र तपासणी वाहनाची भर पडली असून, या वाहनाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन गुरुवार, २८ मे रोजी सकाळी ११.३० वाजता करण्यात आले आहे. अमेरिकास्थित प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. देवदत्त आणि डॉ. सुरेखा मिशाला यांनी दिलेल्या उदार देणगीतून हे वाहन रुग्णालयाला प्राप्त झाले आहे.
या अत्याधुनिक वाहनामुळे ग्रामीण तसेच दुर्गम भागातील रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांच्या नेत्र तपासण्या अधिक सुलभपणे करता येणार आहेत. त्यामुळे अनेक गरजू नागरिकांना घराजवळच नेत्रसेवेचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देणगीदारांच्या सहकार्याने नव सिंधुदुर्गच्या सर्व लाभार्थ्यांना साड्या व टी-शर्टचे वाटप करण्यात येणार आहे. संस्थेमार्फत अनेकांच्या दृष्टीत सुधारणा होत असल्याचा आनंद साजरा करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाला नव सिंधुदुर्गचे सर्व लाभार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष अनंत उगावकर, सचिव सोमनाथ जिजीनी आणि खजिनदार विनया बाड यांनी केले आहे.

You cannot copy content of this page