⚡वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या सहकार्याने दि. २०, आणि २१ मे २०२६ रोजी नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह वेंगुर्ला येथे दोन दिवसीय भव्य “सांस्कृतिक महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. वेंगुर्ला शहराच्या सांस्कृतिक परंपरेला उजाळा देत विविध कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन बुधवार दि. २० मे रोजी सायंकाळी ७.३० वा. सावंतवाडी उपविभागीय अधिकारी शारदा पवार
यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी आरती देसाई,
जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावळे, तहसीलदार ओंकार ओतारी,नगरपरिषद मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, ज्येष्ठ पत्रकार
शेखर सामंत,
अध्यक्ष भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच सुनील नांदोसकर, विकास गवंडे, गुरु ठाकूर , वराळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवत आदी उपस्थित होते.
सांस्कृतिक महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दि. २० मे रोजी सायंकाळी ८ वा. सुप्रसिद्ध मराठी गायक गुरु ठाकूर आणि विजय गवंडे यांची बहारदार “सुरंगी” या संगीत मैफलीचे सादरीकरण करण्यात आले. मराठी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गीतांचा सुरेल संगम या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता आला. त्यानंतर रात्री ११ वा. “अयोध्या महानाट्य” या भव्य दिव्य ऐतिहासिक व सांस्कृतिक नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. रामायणकालीन प्रसंग, नेपथ्य, संगीत आणि प्रकाशयोजना यांचा संगम रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरले.वेंगुर्ला नगरपरिषदेच्या १५० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा सन्मान करताना शहरातील सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धन करण्याचा संदेश या महोत्सवातून देण्यात आला. विविध कलाप्रकार, संगीत, नाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार मनोरंजनासह सांस्कृतिक मेजवानी अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली.कार्यक्रमाचे उदघाट्न शारदा पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्तविक, सूत्रसंचालन संदिप परुळेकर यांनी केले.
गुरुवारी 21 रोजी सायंकाळी स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, ‘देवधून’ संगीत मैफिल, रात्री 9 वा. वेंगुर्ला सुंदरी 2026 आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचा नागरिकांनी, तसेच कला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाट्न संपन्न…
