गुलदार युद्धनौका अंडरवॉटर म्युझियम प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा सूर्योदय…

विष्णू मोंडकर: पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या वतीने पर्यटन विकास मंडळ यांच्या वतीने विष्णू मोंडकर यांनी मांडले महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार..

⚡मालवण ता.२०-:
सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून केंद्र व राज्य सरकारने आधीच मान्य केला आहे. जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असले, तरी जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी एका मोठ्या बहुउद्देशीय प्रकल्पाची गरज होती. आता भारतीय नौदलाची सेवामुक्त झालेली युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ निवती समुद्रात विसर्जित करून देशातील पहिले ‘अंडरवॉटर म्युझियम’ व कृत्रिम प्रवाळ प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा खऱ्या अर्थाने सूर्योदय झाला आहे, असा विश्वास पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकणचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केला आहे.

जागतिक स्तरावर सेशेल्स, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित देशांनी आपल्या निवृत्त युद्धनौका समुद्रात बुडवून त्यांचे रूपांतर जागतिक दर्जाच्या डायव्हिंग केंद्रांमध्ये केले आहे. त्याच धर्तीवर आता भारतात पहिल्यांदाच असा प्रयोग सिंधुदुर्गात होत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किनारपट्टीजवळील निवती रॉक्स परिसरात हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा बहुउद्देशीय पर्यटन प्रकल्प साकारला जात आहे. समुद्रतळापासून सुमारे २२ मीटर खोलीवर हे जहाज सुरक्षितपणे स्थापित करण्यात आले आहे. वैज्ञानिक अभ्यासानंतर निवडण्यात आलेले हे ठिकाण सागरी जैवविविधतेने नटलेले असून, जगातील इतर अशा प्रकल्पांपेक्षा अधिक सुलभ आणि उपयुक्त ठरणार आहे, असे विष्णू मोंडकर यांनी म्हटले आहे.

‘आयएनएस गुलदार’ या युद्धनौकेने भारतीय नौदलात असताना सैनिक, लष्करी उपकरणे आणि आवश्यक साहित्य वाहून नेण्यापासून ते विविध समुद्री व किनारपट्टी संरक्षण मोहिमांपर्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. देशसेवेच्या या गौरवशाली इतिहासानंतर आता हे जहाज समुद्राखालील पर्यटन आणि समुद्री जीवसंवर्धनाचे केंद्र बनणार आहे. हा प्रकल्प पर्यटन, संवर्धन आणि सैनिकी इतिहासाचा एक सुवर्णसंगम ठरेल. हे अंडरवॉटर म्युझियम स्कुबा डायव्हर्स आणि पर्यटकांसाठी खुले असणार आहे. या अंतर्गत पर्यटकांना स्कुबा डायव्हिंग, पाणबुडी पर्यटन आणि समुद्राखालील फोटोग्राफी, समुद्री शैवाल, मासे आणि इतर सागरी जीवांचे संवर्धन, तसेच समुद्र शिक्षण आणि संशोधनाची मोठी संधी मिळणार आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांसह विशेष डायव्हिंग टूरचा अनुभव घेता येणार आहे. या आंतरराष्ट्रीय प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्हा जागतिक पर्यटन नकाशावर ठळकपणे येणार असून स्थानिकसागरी संवर्धन, साहसी पर्यटन आणि स्थानिक रोजगारनिर्मिती यांचा अनोखा मेळ साधणारा हा प्रकल्प सिंधुदुर्गच्या पर्यटन इतिहासातील एक नवा ‘मैलाचा दगड’ ठरणार आहे, स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे. यामुळे स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण आणि गाईड्सना मोठी मागणी निर्माण होईल. बोट सेवा, हॉटेल व्यावसायिक, फोटोग्राफी आणि इतर पर्यटनपूरक उद्योगांना मोठी चालना मिळेल. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या हजारो नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास मोंडकर यांनी व्यक्त केला आहे.

हा प्रकल्प निवती येथे यशस्वीरित्या उभा राहण्यासाठी आणि जिल्ह्याचे पर्यटन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले आहे. याबद्दल पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने पर्यटन विकास मंडळ अधिकारी, शिवसेना आमदार दीपक केसरकर, भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले, असेही श्री. मोंडकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page