नेटवर्कअभावी ऑनलाईन शिक्षण, शासकीय कामे ठप्प; सेवा तात्काळ सुरू न झाल्यास बीएसएनएल कार्यालयावर मोर्चा..
⚡सावंतवाडी ता.२०-:
तालुक्यातील आजगाव गावातील बीएसएनएल टॉवर गेले पंधरा दिवस बंद असल्याने गावात नेटवर्क समस्या निर्माण झाली आहे यासाठी वारंवार बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही सेवा सुरळीत न झाल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत, सदरची सेवा तात्काळ सुरू न केल्यास प्रसंगी ग्रामस्थांना घेऊन कार्यालयावर धडक द्यावी लागेल असा इशारा उपसरपंच सुशील कामतेकर यांनी दिला आहे.
तालुक्यातील आजगाव गावासाठी एकमेव बीएसएनएल ची नेटवर्क सुविधा आहे, परंतु बीएसएनएलच्या टाॅवर हा अधून मधून बंदच असल्याने नेटवर्क अभावी ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत असतात. सद्यस्थितीत गेले पंधरा दिवस हा टॉवर बंद असल्याने नेटवर्क अभावी ग्रामस्थ हैराण झाले आहेत, या संदर्भात उपसरपंच श्री कामतेकर यांनी वारंवार सावंतवाडी येथील बीएसएनएल कार्यालयाला हेलपाटे मारून अधिकारी वर्गांचे लक्ष वेधले परंतु सेवेमध्ये काही सुधारणा झालेली नाही. नेटवर्क अभावी अनेक कामे रेंगाळली गेली आहेत शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण शिवाय शासकीय कामे व अन्य गोष्टी रखडल्या जात आहेत. गावातील ग्रामस्थांना आपल्या कामासाठी नेटवर्कच्या शोधात गावाबाहेर जावे लागत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेता संबंधित यंत्रणेने सदरचे नेटवर्क तत्काळ सुरळीत करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अन्यथा ग्रामस्थांना घेऊन सावंतवाडी येथील कार्यालयावर धडक द्यावी लागणार असल्याचा इशारा उपसरपंच श्री कामतेकर यांनी दिला आहे.
