पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रवीण भोसले यांना आश्वासन..
⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी नगरपरिषदेमधील सफाई कामगारांच्या वारसांना वारस हक्काने तात्काळ नोकरी देण्याबाबत आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे बंदरे विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची शिष्टमंडळाने भेट घेत निवेदन सादर केले.
या शिष्टमंडळामध्ये माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्यासह गोपाळ नामदेव सावंत, सुनील नारायण परब, संदीप भागू पाटील व नितीन सदानंद कदम यांचा समावेश होता. सफाई कामगारांच्या वारसांना वारस हक्काने नोकरी देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र शासन या विषयाबाबत सकारात्मक व सतर्क असल्याचे स्पष्ट केले. नगरविकास मंत्रालयाच्या वतीने मागील अधिवेशनात यासंदर्भात निवेदन करण्यात आले असून, त्यानुसार लवकरच सावंतवाडीतील सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच सावंतवाडी नगरपरिषद कौन्सिलने सफाई कामगारांना त्वरित नोकरी देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला असल्याचेही त्यांनी नमूद केले. आपल्या पुढील सिंधुदुर्ग दौऱ्यात संबंधित वारसांना नियुक्तीपत्रे देण्यात येतील, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिल्याचे समजते.
दरम्यान, या सकारात्मक भूमिकेबद्दल शिष्टमंडळाने पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
