“केवळ दाखविण्यापूर्ती योजना राबवू नका”…

समाज कल्याण समितीत सुमेधा पाताडे यांचा अधिकाऱ्यांना सूचना

⚡सिंधुदुर्गनगरी ता १९-:
लाभार्थींचा आर्थिक स्तर वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रशासकीय कालावधीत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची आजची आर्थिक स्थिती काय? त्यांना या योजनेचा लाभ किती झाला याची माहिती देता येत नसेल, तसेच योजनांचा लाभार्थ्यांना लाभ मिळत नसेल तर योजना राबवून उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित करत. समिती सदस्य सुमेधा पाताडे यांनी केवळ दाखविण्यापूर्ती योजना राबवू नका, योजनेचे गांभीर्य ठेवा. अशा सक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हा परिषद समाज कल्याण समितीची सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती रुहिता तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सचिव तथा प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिशांत कोळप, समिती सदस्य देवदत्त कदम, सुमेधा पाताडे, सुष्मिता जाधव, शिवानी नाईक, साक्षी तळवडेकर, अपर्णा सातोस्कर, प्राची इसवलकर, रिद्धी सुतार, अधिकारी आदी उपस्थित होते.
मागासवर्गीय नागरिकांचे जुने घर दुरुस्तीसाठी अर्थ साहाय्य देणे ही योजना जिल्हा परिषद स्व उत्पन्नातून राबविली जाते. या योजनेंतर्गत लाभार्थ्याला ३५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र वाढती महागाई पाहता या अनुदानात वाढ करण्याची मागणी मागील सभेत सदस्या सुमेधा पाताडे यांनी केली होती. याबाबत आजच्या सभेत चर्चा केली असता वाढीव निधी देण्याबाबतचा निकष असल्याने त्यावर शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा परिषद स्व उत्पन्नातून राबविण्यात येणाऱ्या योजनेचे निकष बदलण्यासाठी चक्क शासनाचे मार्गदर्शन मागविल्याचा अजब प्रकार अधिकाऱ्यांनी केला असल्याचे आजच्या समाज कल्याण समिती सभेत उघड झाले याबाबत सदस्या सुमेधा पाताडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ही योजना शासनाच्या निधीतून राबविली जात नाही. ती जिल्हा परिषद स्व उत्पन्नातून राबविली जात आहे. त्यामुळे वाढीव निधी मंजूर करण्याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्याची गरजच भासत नव्हती. मग तुम्ही कोणत्या आधारे मार्गदर्शन मागितले. आपल्या मनाने कामकाज करायला कोणी संगितले अशा शब्दात खडबोल सुनावत निकष बदलाबाबत केवळ जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मान्यता घ्या अशी सूचना केली.
प्रशासकीय कालावधीत ज्या योजना राबविल्या त्यातून मागासवर्गीय नागरिकांचे आर्थिक उत्पन्न वाढले का त्याचा अहवाल मागील सभेत मागविण्यात आला होता. मात्र तो अहवाल अद्याप मिळाला नसून त्याबाबतची नाराजी व्यक्त करण्यात आली. शेळी मेंढी गट पुरवठा करणे योजनेची माहिती मागितली असता त्याबाबतची अधिकारी सभेत माहिती देऊ शकले नाहीत. तसेच या योजनेचा किती गरजूंना लाभ झाला याचीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे सदस्यांनी सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त केली.

सदस्या सुमेधा पाताडे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला

आजच्या सभेत विविध महत्वाच्या विषयावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सदस्या सुमेधा पाताडे यांनी आवाज उठवला. विविध मुद्यांवर प्रशासनाला धारेवर धरले. मात्र सभापती आणि अन्य सात सदस्यांनी सभागृहात एकही शब्द काढला नाही. केवळ सुमेधा पाताडे यांनीच विविध प्रश्न उपस्थित करत आजची सभा चालविली.तर महिला सदस्य आहेत म्हणून हलक्यात घेऊ नका असा इशारा अधिकाऱ्यांना दिला .

You cannot copy content of this page