आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे..
⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१९-: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद रायगड-तथा-रत्नागिरी-तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाकरिता निवडणूक कार्यक्रम १८ मे २०२६ रोजीपासून घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच १८ मे २०२६ पासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच २५ जून २०२६ पर्यंत रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या पूर्ण क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या कालावधीत आचारसंहितेचा भंग होणार नाही याची संबंधित अधिकारी आणि संबंधित संस्थांनी दक्षता घ्यावी. आचारसंहिता भंगा बाबत कोणतीही घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरण्यात येईल. भारत निवडणूक आयोगाने आचारसंहिते बाबत NO 322/ECI/INST/FUNC/BIEN-LC/2816 दिनांक 26 डिसेंबर 2016 रोजीच्या पत्राने मार्गदर्शक सूचना पारित केल्या असून आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आदेशित केले आहे.
या निवडणुकीसाठी सोमवार २५ मे २०२६ रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार १ जून २०२६ असेल. नामनिर्देशन पत्र रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्या कडे दाखल करता येईल तसेच सर्व निवडणूक प्रक्रिया रत्नागिरी येथील निवडणूक निर्णय अधिकारी येथे पार पाडली जाणार आहे.
मंगळवार २ जून २०२६ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून गुरुवार ४ जून २०२६ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. या निवडणुकांसाठी मतदान गुरूवार १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. मतमोजणी सोमवार २२ जून २०२६ रोजी करण्यात येईल, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक गुरूवार, २५ जून २०२६ हा आहे.
००००००००
