⚡वेंगुर्ला ता.१९-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य व वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने वेंगुर्ला शहरात दिनांक २० मे ते २६ मे या कालावधीत सांस्कृतिक व चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. परंतु अवर सचिव, निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे कडील प्रेस नोट क्र. ECI/PN/087/2026 दिनांक १८ मे २०२६ अन्वये राज्यात महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य प्राधिकरणाच्या मतदारसंघांकरीता निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू केली असल्याने दिनांक २२ मे २०२६ ते २६ मे २०२६ या कालावधीत नियोजित असलेले स्वरेया २०२६ ‘इंडियन आयडॉल’ फेम प्रसिद्ध गायक चेतना भारद्वाज आणि नचिकेत लेले यांच्या संगीत मैफिलीचा कार्यक्रम तसेच चित्रपट महोत्सव स्थगित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या महोत्सवादरम्यान आयोजित केलेले सर्व सत्कार समांरभ देखील तूर्तास स्थगित करण्यात आलेले आहेत. चित्रपट महोत्सवाची पुढील तारीख आणि सुधारित वेळापत्रक आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर निर्णय घेऊन नागरिकांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. वेंगुर्लेकर नागरिक, रसिक प्रेक्षक, प्रायोजक आणि स्थानिक कलाकारांनी या अनपेक्षित बदलाची नोंद घ्यावी. तथापी सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या कडून पूर्वनियोजित दि. २० मे रोजी सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध गायक गुरु ठाकूर आणि विजय गवंडे यांची सुश्राव्य संगीत मैफिल ‘सुरंगी’ रंगणार आहे, तर रात्री ९ वाजता भव्य ‘महानाट्य अयोध्या’ चा प्रयोग होणार आहे. तसेच महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी २१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता स्थानिक कलाकारांचे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम व सायंकाळी ७ वाजता भक्तीमय फ्युजन संगीत मैफिल ‘देवधून’ आणि रात्री ९ वाजता वेंगुर्लाकरांचे मुख्य आकर्षण असणारी भव्य सौंदर्य स्पर्धा ‘वेंगुर्ला सुंदरी’ पार पडणार आहे. सदर कार्यक्रम मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृ येथे संपन्न होणार आहेत, त्याचा लाभ सर्व रसिक प्रेक्षकानी घ्यावा, याची नोंद घ्यावी, असे वेंगुर्ला नगरपरिषद प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.
वेंगुर्ला येथील संगीत मैफिलीचा कार्यक्रम तसेच चित्रपट महोत्सव स्थगित…
