भर बाजारपेठेत गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी…

लक्ष वेधून देखील प्रशासनाचे दुर्लक्ष: नगरसेवक देव्या सूर्याजी, शर्वरी धारगळकर यांची नाराजी..

⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ६ मधील मुख्य बाजारपेठेतील हॉटेल चंदू भुवन समोरील गटार गेली अनेक वर्षे तुंबलेल्या अवस्थेत असून, गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने नागरिक, व्यापारी तसेच परिसरातील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावरही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सध्या नगरपालिका प्रशासनाकडून सक्शन मशीनच्या सहाय्याने गटारातील पाणी उपसण्याचे तसेच तात्पुरत्या स्वरूपात तुकपट्टी लावण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही उपाययोजना केवळ तात्पुरती असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्थानिक नगरसेवक देव्या सूर्याजी आणि नगरसेविका शर्वरी धारगळकर यांनी वारंवार पाठपुरावा करून आवाज उठविला. तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. सरडे आणि आरोग्य विभागाचे अधिकारी विनोद सावंत यांच्या निदर्शनासही ही बाब आणून देण्यात आली. तरीदेखील तातडीची कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी नगरपालिका प्रशासन तसेच सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. “सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यापेक्षा केवळ भूमिपूजन आणि प्रसिद्धी मिळविण्यात प्रशासन व सत्ताधारी व्यस्त आहेत,” अशी टीका नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर यांनी केली.

“भर बाजारपेठेतील गटारे तातडीने बांधून बंदिस्त करण्यात आली नाहीत, तर याला नगराध्यक्ष आणि नगरपरिषदेचा आरोग्य विभाग सर्वस्वी जबाबदार राहील,” असा इशाराही त्यांनी दिला.

You cannot copy content of this page