वेंगुर्ला मठ येथील विविध अपूर्ण कामाबाबत शासनाने लक्ष द्यावे…

मठ कार्यक्षेत्रातील धोकादायक बाबीकडे अजित नाईक यांचे दुर्लक्ष का ?

⚡वेंगुर्ला ता.१७-:
वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी विशेष बैठक घेऊन केलेल्या सूचनानुसार वेंगुर्ला सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित काम हाती घेत साईडपट्टी भरावाचे काही भाग वगळता ‘चांगले’ काम केले आहे. त्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. परंतु एमईसीबी विभाग व संबंधित मक्तेदार मात्र काम करण्याचे आश्वासन देऊनही लोकप्रतिनिधीना जुमानत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मठ टाकयेवाडी एरियातील उर्वरित काम पाऊस तोंडावर असूनही काम अपूर्ण आहे. भर पावसात काम सुरु करून रस्ता चिखलमय करणार का, असा सवाल स्थानिकातून व्यक्त करण्यात आला आहे. श्री देव बादेश्वर मंदिर एरियातील सुमारे पाचशे मीटर अंतरावर केलेली साईडपट्टी भराव ही मलमपट्टीच ठरून पावसाळ्यात ट्रान्सपोर्ट चे ट्रक रूतण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस असूनही मठ कुडाळतिठा येथे भरावाची माती चक्क ‘गटारात’ ढीग ओतण्यात आला आहे. मठ ठाकूरवाडी येथे मुख्य रस्त्याच्या कडेला ‘दगड’ रचण्यात आले असून गंभीर अपघात झाल्यास भरपाई कोण देणार ? या सर्व बाबीकडे गावातील भाजपचे पदाधिकारी असलेले अजित नाईक हे दुर्लक्ष करीत आहेत का? व संबंधिताना पाठीशी घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप वाहनधारकांतून करण्यात आला आहे.जीर्ण झालेल्या मठ ग्रामपंचायत नूतन इमारतीसाठी माजी शालेय शिक्षणमंत्री व आमदार दिपक केसरकर यांनी तातडीने निधी उपलब्ध करून देऊनही ग्रामपंचायत मुख्य कमानवर नाव लिहिण्यात दिरंगाई केली गेली आहे, त्यामुळे येथील ग्रामपंचायत अधिकारी यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे. मठ ग्रामपंचायत नजिक एरियात मुख्य शासकीय कार्यालये असूनही पावसाळ्यात गटारातील पाण्याचा निचरा होण्यासाठी मठ ग्रामपंचायत कधी व कोणत्या वर्षी प्रयत्न करणार, असा सवाल व्यक्त करण्यात आला आहे.कारण दूषित पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या दरवर्षी निर्माण होतात. मठ कुडाळतीठा वळणावर कायम अपघात होतात. याठिकाणी मोठ्या प्रमाणात अनावश्यक ‘बॅनर’ उभारले जातात. मठ कुडाळतीठा येथे हॉटेलसमोरील साईडपट्टी पूर्णतः खचली आहे. मठ कुडाळतिठा वळणावरील गटारांची तातडीने पाहणी होणे आवश्यक आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नाईक यांनी केली आहे. तसेच मठ शिवाजी चौक समोरील वळणावरील अरुंद कामाबाबत शासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी मठ ग्रामपंचायत माजी सरपंच तुळशीदास ठाकूर यांनी केली आहे.मठ मठकरवाडी येथे झालेला गंभीर अपघात पाहता शासनाने येथील पूलाकडील खचलेल्या भागाची त्वरित पाहणी करावी, अशी मागणी स्थानिकातून करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी मठ कुडाळतिठा ते मठ टाकयेवाडी रस्त्याची दुसऱ्या बाजूच्या साईडपट्टी भरावाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी मठ सरपंच सौ. रुपाली नाईक यांनी केली आहे.

You cannot copy content of this page