डायलेसिस विभागातील त्रुटींवर संताप; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना तात्काळ फोन..
⚡देवगड ता.१५-:
येणाऱ्या पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सक्षम व सतर्क राहावी यासाठी पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे व उपसभापती अमोल लोके यांनी देवगड ग्रामीण रुग्णालयास सरप्राइज भेट देत विविध विभागांची पाहणी केली. यावेळी रुग्णालय प्रशासनाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध ठेवून आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी ग्रामीण रुग्णालयातील औषधसाठा, स्वच्छता व्यवस्था, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपलब्धता, रुग्णसेवा तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध विभागांना भेट देत सेवा व्यवस्थेची प्रत्यक्ष माहिती घेण्यात आली.
दरम्यान, रुग्णालयातील डायलेसिस विभागाची पाहणी करताना गंभीर बाब समोर आली. ग्रामीण रुग्णालयात चार डायलेसिस मशीन उपलब्ध असूनही त्या मशीनसाठी आवश्यक सामग्री उपलब्ध नसल्यामुळे डायलेसिस सेवा प्रभावीपणे सुरू नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी डायलेसिस तज्ञ संबंधित विभागात उपस्थित असतानाही रुग्णांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली.
ही परिस्थिती पाहून उपसभापती अमोल लोके यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. रुग्णांना मूलभूत आरोग्य सुविधा वेळेत मिळत नसल्याबद्दल त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
“शासकीय रुग्णालयात असा कारभार सुरू असल्यामुळे सर्वसामान्य जनता लोकप्रतिनिधींच्या नावाने ओरडत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत व दर्जेदार उपचार मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. आवश्यक सामग्री तातडीने उपलब्ध करून डायलेसिस सेवा नियमित सुरू करावी,” अशी प्रतिक्रिया उपसभापती अमोल लोके यांनी यावेळी दिली.
सभापती गणेश राणे यांनीही पावसाळ्यात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने विशेष दक्षता घ्यावी, असे सांगितले. तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्व सेवा सुरळीत व तत्परतेने सुरू ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
यावेळी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. तसेच रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांबाबत माहिती घेत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.
यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
