तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक..
⚡बांदा ता.१५-: राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री शेतपाणंद रस्ते खुले करा” या अभियानाअंतर्गत कास गावात बंद अवस्थेत असलेले शेतपाणंद रस्ते पुन्हा सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी कास गावाला भेट देत सरपंच प्रवीण पंडित यांच्या कार्याचे कौतुक केले.
सरपंच प्रवीण पंडित, ग्रामपंचायत अधिकारी श्री ठाकूर तसेच ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या सहकार्याने गावातील अनेक वर्षांपासून बंद असलेले एकूण नऊ शेतपाणंद रस्ते खुले करण्यात आले. या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार असून ट्रॅक्टर व अन्य यंत्रसामग्री थेट शेतापर्यंत पोहोचू शकणार आहे.
तहसीलदार श्रीधर पाटील यांनी पाहणीदरम्यान सांगितले की, कोणताही वाद निर्माण न करता शेतकऱ्यांना समजावून सांगून लोकसहभागातून एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतरस्ते सुरू करणे ही कौतुकास्पद बाब आहे. गावातील शेतकऱ्यांना भुईमूग, शेंगदाणे, चवळी, नाचणी यांसारख्या पिकांसाठी योग्य बाजारपेठ व हमीभाव मिळण्यासाठी हे रस्ते महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही त्यांनी नमूद केले.
प्रवीण पंडित यांनी सांगितले की, “माझा शेतकरी बांधव खचला नाही पाहिजे, या उद्देशाने आम्ही शेतपाणंद रस्ते खुले करण्याचे काम सुरू केले. काही रस्ते स्वखर्चातून तर काही लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मिळालेला निधी वेळेत व योग्य पद्धतीने खर्च करून गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले.”
पंडितवाडी ते किनळेकरवाडी तसेच किनळेकरवाडी ते पार हद्दीपर्यंतचे शेतपाणंद रस्ते लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले. या कामासाठी कास गाव विकास मंडळ, मुंबई तसेच ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी कास ग्राममहसूल अधिकारी सीमा कांबळे, कोतवाल विनोद धुरी, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ पंडित तसेच नारायण पंडित, अभिमन्यू कासकर, पांडुरंग पंडित, नामदेव पंडित, जयवंत पंडित, शशिकांत पंडित, शांताराम राणे, बाळकृष्ण पंडित, महादेव राणे, घनश्याम पंडित, काशीराम पंडित, अनिल किनळेकर, प्रविण शांताराम पंडित आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो:-
कास येथे शेत रस्त्याची पाहणी करताना तहसीलदार श्रीधर पाटील. सोबत सरपंच प्रवीण पंडित व इतर.
