गाळमुक्त करण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधीची मागणी करावी: सभेमध्ये घेतला ठराव..
⚡सिंधुदुर्गनगरी ता ११-:
सिंधुदुर्गातील बंधारे व तलाव गाळाने भरले आहेत. यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून सर्व तलाव व बंधारे गाळमुक्त करण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधीची मागणी करावी. असा ठराव. आजच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सभेत करण्यात आला.
जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या दालनात संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष दादा साईल, समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड ,सभापती प्रितेश राऊळ, रुहिता तांबे, संतोष साटविलकर ,समिती सदस्य वर्षा सांबरी, सुप्रिया वालवलकर, आरती पाटील, मनोज रावराणे, सुनील पारकर, केशव नारकर, यांच्यासह खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
आजच्या सभेत जिल्ह्यातील विविध बंधारे व तलाव गाळाने भरले आहेत. यामुळे गाळ न काढल्यास पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे याकडे सदस्यांनी लक्ष वेधले असता बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी निधीची गरज असून निधी उपलब्ध झाल्यास गाळ काढण्याची नियोजन करता येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले असता बंधारे व तलाव यातील गाळ काढण्यासाठी जिल्हा नियोजन कडे निधीची मागणी करावी तसा ठराव आजच्या सभेत घेण्यात आला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामे मोठ्या प्रमाणात अर्धवट असून जलजीवन मिशनमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी उपलब्ध असूनही पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. ही कामे करताना पूर्वीच्या सुरू असलेल्या योजनाही बंद पाडण्यात आल्या आहेत. पाण्याच्या टाक्या तसेच पाईपलाईन काढून टाकण्यात आली आहे. नव्याने करण्यात आलेली नळयोजनेची कामे अर्धवट असून काही कामे पूर्ण होऊनही केवळ विद्युत कनेक्शन न दिल्याने बंद स्थितीत आहेत.याकडे सदस्यानी सभागृहाचे लक्ष वेधत याबाबत योग्य तो तोडगा काढावा . अशी सूचना केली . सद्यस्थितीत नागरिकांची पाण्याची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे पूर्णत्वाकडे आलेल्या योजना पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत मार्ग काढण्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमाबाबत आठ दिवसात खास सभा आयोजित करावी. असे आदेश अध्यक्ष प्रमोद कामत यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.तर यावेळी माहिती देताना जलजीवन मिशन अंतर्गत एकूण ७१८ कार्यारंभ आदेश दिलेल्या योजनांपैकी ७१२ योजनांची कामे सुरू असून ६ योजनांच्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. तर ३२१ कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण असून २३ कामे आर्थिक दृष्ट्या पूर्ण झाली असल्याची माहिती सभेत देण्यात आली.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आढावा देताना सन २०२५-२६ साठी जिल्ह्याला सार्वजनिक शौचालय ७६ चे उद्दिष्ट होते. आतापर्यंत ६७ शौचालयाच्या कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत . ३८ शौचालयांची कामे प्रगतीत असून २९ सार्वजनिक शौचालय बांधकाम पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळी सभेत देण्यात आली.
