मालवण शहरातील गटार बांधणीची कामे नित्कृष्ट दर्जाची; सर्व कामांची तपासणी व्हावी…

नगरपालिका सभेत बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांचा आरोप..

⚡मालवण ता.११-:
मालवण शहरातील मेढा येथील हॉटेल आना नाना ते मुरलीधर मंदिर ते रघुनाथ देसाई हायस्कूल कॉर्नर पर्यंत गटार बांधणीचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार झालेले नसून हे काम नित्कृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप मालवण नगरपालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी मालवण नगरपालिकेच्या विशेष बैठकीत केला. या कामासह शहरातील इतर गटार बांधणीच्या कामांच्या दर्जावरही सहदेव बापर्डेकर यांनी प्रश्नचिन्हे उपस्थित करत आपण बांधकाम सभापती म्हणून नगरपालिका बांधकाम अभियंता व ठेकेदार यांना सूचना देऊनही कामे योग्य पद्धतीने झालेली नसल्याचे बापर्डेकर यांनी सांगत या सर्व कामांची पाहणी व तपासणी करून पंचयादी घालावी, अशी मागणी नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्याकडे केली.

मालवण नगरपालिकेच्या सोमवारी झालेल्या विशेष सभेत बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी मालवण शहरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या गटार बांधणीच्या कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत यां कामांच्या तपासणीची मागणी नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्याकडे केली. यावेळी बापर्डेकर म्हणाले, मेढा येथील आना नाना हॉटेल ते मुरलीधर मंदिर ते रघुनाथ देसाई हायस्कुल कॉर्नर पर्यंत गटार बांधण्याच्या कामाबाबत प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी आपण बांधकाम सभापती या नात्याने नगरपालिका कनिष्ठ अभियंता व ठेकेदार यांना काम योग्य पद्धतीने होण्याबाबत सक्त सुचना दिल्या होत्या. त्यावेळी इतर नगरसेवकही उपस्थित होते. मात्र सदर गटार बांधणीच्या कामात जे स्टिल वापरले आहे त्याची वापरण्याची पद्धत चुकिची आहे. ६ इंचावर स्टिल बांधणे आवश्यक आहे परंतु माझ्या माहितीनुसार स्टिल हे ८ इंचावर बांधले आहे. गटार बांधकाम करताना काँक्रीटची जाडी ही अंदाज पत्रकानुसार ४ इंच आवश्यक आहे, परंतु बांधकामात सुमारे ४ इंच काँक्रीट नाही आहे. गटार बांधकाम बॉटम स्लॅब V हांचेस हवा, परंतु तसा ठेवला नाही. कामावर नेम बोर्ड आवश्यक असताना तो सुद्धा कामाच्या सुरुवातीला लावला नाही. सदर कामात रोड क्रॉसिंग नमुद असताना रोड क्रॉसिंग झालेले नाही. सदर पूर्ण काम अंदाजपत्रकानुसार झालेले नाही. असे असताना सदर कामाचे देयक अदा केले आहे का ? केले तर किती रक्कम अदा केली हे सांगावे, असेही बापर्डेकर म्हणाले. मेढा येथील सदर गटार बांधणी कामाबाबत नगरपालिका कनिष्ठ अभियंता यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या उपस्थितीत पाहणी व तपासणी करून काम योग्य आहे का अयोग्य याची पंचयादी घालावी, अशी मागणीही बापर्डेकर यांनी केली.

त्याचप्रमाणे हॉटेल आना नाना ते मुरलीधर मंदिर ते रघुनाथ देसाई हायस्कूल कॉर्नर गटार बांधणे आणि मालवण शहर पिंपळपार ते लौकिक हॉटेल ते मौनिनाथ मंदिर राजकोट किनारपट्टीपर्यंत अस्तित्वातील गटारावर लादी बसवणे ही दोन्ही कामे कोणत्या बाजूने सुरू होणार आहेत, केलेले काम कोणत्या बाजूस आहे व सुरू होणारे काम कोणत्या बाजूस सुरू होणार आहे याचा खुलासा करावा, अशी मागणीही सहदेव बापर्डेकर यांनी केली. तसेच मालवण गोडावून रस्ता ते सारस्वत बँक रस्ता येथे पावसाळी पाणी निचरा साठी दुतर्फा आरसीसी गटार बांधणे कामात सुद्धा अंदाज पत्रकाप्रमाणे काम झालेले नसून दर्जा देखील नित्कृष्ट आहे. तरी या कामाची सुद्धा साईट व्हिजीट करून सखोल तपासणी होणे आवश्यक आहे, अशी मागणीही बापर्डेकर यांनी केली.

शहरातील सर्व गटार बांधणी कामांबाबत मालवण नगरपालिकेचे कनिष्ठ व वरिष्ठ अभियंता यांना सक्त सुचना देउन सुद्धा कर्मचारी ठेकेदाराचे हित जोपासत शासनाचे नुकसान करत आहे. तरी संबधित कामांची व अधिकारी वर्गाची सखोल तपासणी व्हावी, असेही बापर्डेकर यांनी सांगितले. यावर नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना देण्यात येतील असे सांगितले.

You cannot copy content of this page