“सोमनाथ स्वाभिमान पर्व” उत्साहात साजरे…

देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथे थेट प्रक्षेपणासह धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.११-:
भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक असलेल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “सोमनाथ स्वाभिमान पर्व : १००० वर्षे अखंड आस्था” या राष्ट्रीय उत्सवांतर्गत देवगड तालुक्यातील ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर परिसरात रविवारी विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडले. तहसीलदार कार्यालय देवगड मार्फत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित या उपक्रमात सकाळी १० ते १२ या वेळेत गुजरातमधील सोमनाथ येथे पार पडलेल्या मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) करण्यात होते. मंदिर परिसरात एलईडी स्क्रीन आणि ध्वनी व्यवस्थेची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.

यावेळी कुणकेश्वर मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. धार्मिक वातावरणात मंत्रोच्चार, ओंकार जप आणि भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

सोमनाथ मंदिराच्या इतिहास, पुनर्निर्माण आणि भारतीय संस्कृतीतील महत्त्वाविषयी माहिती देण्यात आली. या माध्यमातून नागरिकांमध्ये सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमान आणि जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले होते.

००००००

You cannot copy content of this page