माजी मंत्री भाई गिरकर यांची माहिती: डॉ. भीमराव आंबेडकर, नीतेश राणे राहणार उपस्थित..
⚡देवगड ता.०९-:
देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ, मौजे गिर्ये बौद्धजन विकास मंडळ, महिला सेवा संघ विजयदुर्ग विभाग व पंचशील महिला मंडळ (मुंबई व ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने १२ मे रोजी सकाळी ११ वाजता पडेल कॅन्टीन येथील साई गणेश मंगल कार्यालय येथे भव्य धम्म मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राज्याचे माजी मंत्री विजय उर्फ भाई गिरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील हॉटेल डायमंड येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाई गिरकर यांनी धम्म मेळाव्याची रुपरेषा स्पष्ट केली. यावेळी अनिल पुरळकर, दिलीप वाडेकर, दीपक गिरकर, उत्तम कांबळे, सचिन गिरकर आदी उपस्थित होते. सदर धम्म मेळावा माजी मंत्री भाई गिरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून स्वागताध्यक्षपदी डी. के. पडेलकर हे असणार आहेत. या मेळाव्याची माहिती देताना भाई गिरकर म्हणाले, या मेळाव्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव आंबेडकर हे प्रथमच देवगडमध्ये येत आहेत. ते मेळाव्यात धम्म प्रवचनातून आपले विचार मांडणार आहेत. या मेळाव्यासाठी भन्तेजी पारा बुद्धिश्री, भन्तेजी बुद्ध मित्र थेरो, भन्तेजी बुद्धपाल थेरो, भन्तेजी राहुल मित्र थेरो, भन्तेजी प्रज्ञा बोधी, भन्तेजी अनुराधा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्यामसुंदर ओंबळकर, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचे सुयोग्य नियोजन करण्यात आले. या मेळाव्याचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून मेळाव्यासाठी सुमारे एक हजाराहून अधिक समाज बांधव उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
