⚡कुडाळ ता.०९-: तालुक्यातील पावशी मिटक्याची वाडी येथील ३० वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. अमित अनिल पेडणेकर असे त्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार सत्यवान सखाराम मयेकर (रा. पावशी मिटक्याची वाडी) यांनी कुडाळ पोलिसात दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संबंधित तरुणाचे वडील अनिल राजाराम पेडणेकर हे ४ दिवसांपूर्वी आपली मुलगी व पत्नी यांच्या समवेत मेहुणीच्या मुलाच्या लग्नासाठी वेंगुर्ला येथे गेले होते. त्यामुळे अमित हा घरी एकटाच होता. यावेळी अनिल पेडणेकर यांनी सत्यवान पेडणेकर यांना घरी लक्ष ठेवण्यास सांगितले होते.
शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अमित हा मयेकर यांच्या घरी आला. यावेळी आईने आपल्याला घरच्या माळ्यावर ठेवलेले गरम समान घेऊन वेंगुर्ल्याला येण्यास सांगितले असून हे समान माळ्यावरून काढण्यासाठी मयेकर यांच्याकडून शिडी मागून घेऊन गेला.
सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अमित याचे वडील अनिल पेडणेकर यांनी मयेकर यांना फोनवरून अमित आपला फोन उचलत नसल्याचे सांगितले. तसेच तो घरी झोपला असेल तर त्याला उठवून वेंगुर्ला येथे येण्यास सांगा असे सांगितले. त्याप्रमाणे मयेकर या पेडणेकर यांच्या घरी जाऊन अमित याला हाक मारली असता कोणताही प्रतिसाद आला नाही. यावेळी मयेकर यांनी घरात जाऊन पाहिले असता तो हॉलमध्ये आढळून आला नाही. त्यामुळे घराच्या आतील बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता छताच्या लोखंडी वाशाला गळफास घेतला असल्याचे समजले. परंतु गळफास घेण्यासाठी वापरण्यात आलेली दोरी तुटल्याने तो खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आला. यावेळी मयेकर यांनी ताबडतोब शेजाऱ्यांना बोलावून घेत सविस्तर वृतांत सांगितला. सर्वांनी अमितला जवळ जाऊन पाहिले असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर ही बाब अमित याच्या वडीलांना कळून त्यांना घरी बोलावून घेण्यात आले.
अमित हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असून त्याच्या निधनामुळे पेडणेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अमित हा त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे गावात सर्वांचा परिचित होता. त्याच्या या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पावशी येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या…
