दादा साईल यांचे वैभव नाईक यांच्या व्हिडीओवर प्रत्त्युत्तर..
⚡कुडाळ ता.०९-: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज आमदार निलेश राणे यांच्या वर एका व्हिडीओद्वारे टीका केली त्यावर शिंदे शिवसेनेचे दादा साईल यांनी प्रतिक्रिया देत वैभव नाईकांवर निशाणा साधलाय. माजी आमदार वैभव नाईक यांनी दुसऱ्यांनी फेकलेल्या तुकड्यांवर आपली पोस्ट देण्यापेक्षा स्वकर्तृत्वाने दाखले द्या असे प्रत्त्युत्तर दादा साईल यांनी दिले आहे. कुडाळ एमआयडीसी येथे आज सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिंदेसेनेच्या दीपलक्ष्मी पडते यांनी देखील वैभव नाईक यांच्यावर टीका केली.
दादा साईल यांनी आज सायंकाळी एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी काका कुडाळकर, दीपक नारकर, विनायक राणे, रुपेश कानडे उपस्थित होते. दादा साईल म्हणाले, वैभव नाईक यांनी काल सोशल मीडियाच्या माध्यमातून घोडगे येथे घडलेल्या घटनेबद्दल पोस्ट केली आहे. वैभव नाईक यांनी गेल्या दहा वर्षात आपल्या मतदारसंघात काय दिवे पाजळले ते सगळे जनता जाणून आहे. या वैभव नाईकांना आपल्या मतदारसंघांमध्ये स्वतःची अक्कल लावून विकास कामे करता आली नाहीत, त्यांनी आता कोणतेच काम न उरल्याने इतर पक्षांमध्ये नाक घुसत बसण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
या वैभव नायकांना आमदार असताना विधानभवनातील सुरक्षा रक्षक देखील ओळखत नव्हते, त्यांना येथील जनता कसे ओळखणार?? त्यामुळे आपली पुसलेली ओळख मिळवण्यासाठी ते केविलवाणा करत आहेत.
गेल्या दहा वर्षांमध्ये इथल्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. परंतु या संधीचा तुम्ही स्वतःचे खिसे भरण्यासाठी वापर करून घेतला आणि आपल्या मर्जीतील किंवा घरातील कॉन्ट्रॅक्टरला कामे देऊन ती परस्पर लाटून जनतेवर अन्याय केला हे इथली जनता विसरली नाही..
आता जेव्हा तुम्हाला काहीच काम शिल्लक नाही त्यावेळी तुम्ही आम्ही फेकलेल्या तुकड्यांवर आपल्या नसलेल्या अकलेचे तारे तोडून पोस्ट करण्यापेक्षा स्वकर्तृत्वाने केलेल्या कामांचे दाखले द्यावेत. सत्तेत असताना पण आणि आता सत्तेत नसताना पण फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी दशतवाद म्हणून ओरड मारण्याची यांची जुनी सवय आहे. पण आपण मात्र स्वतःच्या निवडणुकीत मुंबईतील गुंड लोकांची सेटिंग लावायची. या बाबा भालचंद्र डेव्हलपर्स या नावाने बोगस कम्पनी उभी करून अनधिकृत बांधकामे कोणी उभी केली हे वैभव नाईकांनी जनतेला सांगावे. उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नये.
वैभव नाईक ज्या म्हातु मान्येकरांची पाठराखण करत आहेत, त्यानी आपल्या समाजासाठी आणि आपल्या हिंदू धर्मासाठी काय दिवे लावलेत एकदा वैभव नाईकांनी त्या भागात जाऊन पहावेत.
वैभव नाईक आणि त्यांच्या उबाठा पक्षाचे सर्वच पदाधिकारी हिंदूहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या विरोधात जाऊन हिंदू विरोधी तत्वांची सातत्याने पाठराखण करत आहेत, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. याच वैभव नाईकांनी कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी त्यांच्या स्वतःच्या पक्षाकडे पुरेसे संख्याबळ असताना देखील काँग्रेस पक्षाच्या हिंदू विरोधी विचारधारा असलेल्या नगरसेवकांना नगराध्यक्षपद दिले होते हे कुडाळची जनता अजून विसरली नाही. येणाऱ्या काळात या सर्व प्रश्नांची उत्तरे वैभव नाईक यांना जनतेला निश्चितच द्यावी लागणार आहेत.
वैभव नाईक म्हणतात म्हातु मान्येकर चार वेळा जिल्हा परिषद सदस्य होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. मग आंब्रड मतदार संघ नेहमीच मागासलेला का राहिला? इथली राहिलेली विकास कामे गेल्या तीन वर्षात निलेश राणे साहेब यांनी या भागाची जबाबदारी घेतल्यानंतर मार्गी लागली आणि आता इथल्या सर्वसामान्य जनतेला चांगले दिवस यायला लागलेत, असे दादा साईल यांनी सांगितले. यावेळी दीपलक्ष्मी पडते याणी देखील माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली.
