⚡बांदा ता.०९-; हिंदू समाजाच्या ऐक्य, संघटन आणि संस्कृती संवर्धनाच्या उद्देशाने सकल हिंदू समाज आंबोली-चौकुळ-गेळे यांच्या संयुक्त विद्यमाने आंबोली येथे भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन मंगळवार दिनांक 12 रोजी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे संमेलन कोणत्याही राजकीय पक्ष, संघटना किंवा व्यक्तीमार्फत नसून सकल हिंदू समाजाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
संमेलनानिमित्त सायंकाळी ४ ते ६ या वेळेत श्रीराम मंदिर, बाजारवाडी आंबोली ते श्री देवी माऊली मंदिर आंबोली अशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत ढोल पथक, भगवा ध्वज, प्रभू श्रीरामचंद्रांचा रथ, छत्रपती शिवरायांची प्रतिमा तसेच भारत माता यांच्या आकर्षक रथांचा समावेश असणार आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व हिंदू बांधव आणि भगिनी पारंपरिक वेशभूषेत सहकुटुंब सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. शोभायात्रेसाठी श्रीराम मंदिर, बाजारवाडी येथे दुपारी ३.३० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शोभायात्रेचा समारोप श्री देवी माऊली मंदिर येथे होणार असून त्यानंतर सायंकाळी ६ वाजता भव्य हिंदू संमेलन पार पडणार आहे. यावेळी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ. पंकज दिघे (मालवण) यांचे हिंदू धर्म, संस्कृती संवर्धन व पंच परिवर्तन या विषयावर व्याख्यान होणार आहे. आंबोली गावची सुकन्या ह.भ.प. सायली महाराज गावडे यांचेही व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आंबोली, चौकुळ, गेळे तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी या भव्य हिंदू संमेलनास सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाज आंबोली-चौकुळ-गेळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
आंबोलीत भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन…
